मुंबई : अतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मायानगरी मुंबईवर मुंबई पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याचा म्हणजे सीसीटीव्हीचा वॉच आहे. हेच सीसीटीव्ही गुन्ह्याचा उलगडा करण्यास जितके उपयुक्त आहेत, तेवढीच शहरात उद्भवणारी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती हाताळण्यास पोलिसांना या सीसीटीव्हीची मदत होत आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर हे शहर अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले. शहरातील अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. याच उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई पोलीस दलाला आपत्कालीन एक सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आली आहे. व्हॅनच्या छतावर चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले असून याच छतावर वायरलेस आणि सॅटेलाईट डिश बसविण्यात आली आहे. याचे नियंत्रण व्हॅनच्या आत बसविण्यात आलेल्या सहा स्क्रीन आणि मशिनच्या आधारे करण्यात येते.
व्हॅन म्हणजे चालता फिरता नियंत्रण कक्ष
शहरामध्ये कोणत्याची ठिकाणी दंगल, मोर्चा, मोठे आंदोलन, सभा किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ही व्हॅन तेथे पाठविण्यात येते. या व्हॅनद्वारे तेथील सर्व परिस्थीतीचे चित्रीकरण करण्यात येत असून ते थेट मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून बघता येते आहे. तसेच या परिस्थितीची वायरलेस यंत्रणेच्या मदतीने माहितीही देणे शक्य होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक सोयीस्कर ठरताना दिसत आहे. व्हॅनमधून ही यंत्रणा चालविण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई पोलीस दलाला आधुनिक करण्यात एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकूणच ही व्हॅन म्हणजे एक छोटा चालता फिरता नियंत्रण कक्षच आहे.