लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या कोळीवाड्यासाठीची सरकारची ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी कोळी बांधवांसाठी अन्यायकारक आहे. आमचं सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी तत्काळ ती रद्द करणार असल्याचे आश्वासन उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिले. राज्य सरकारच्या तिजोरीवर मदत योजनांना निधी दिल्याने ताण पडत नसून बिल्डर, कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निर्णय घेतल्याने ताण पडत आहे. आमचे सरकार आल्यानंतर ही नियमबाह्य कंत्राटेही रद्द करणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबईमधले सगळे प्लॉट आणि महापालिकेच्या अखत्यारीतील प्लॉट विकायला काढले आहेत. यात कोळी बांधवांनी मांडलेली व्यथा आणि त्यांच्यावर होणारा अन्याय आमच्या पुढे आला. गावठाण आणि कोळीवाड्यांवर त्यांचे लक्ष गेले आहे. तिथे क्लस्टर करणार आहेत. आज कोळी बांधव ज्या क्षेत्रात राहतात त्यांना एका जागेत कोंबले जाणार आहे. हे सरकार बिल्डरला फुकटात भूखंड देत आहे. पण कोळी वाड्याचे सीमांकन झाले पाहिजे, आणि आम्ही आमचं सरकार आल्यावर ते करणार, असे आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.
राज्याच्या तिजोरीवर मदत योजनांचा ताण नाही तर बिल्डर, कंत्राटदारांना फायदा मिळवून दिल्याने ताण आला आहे. आमची सत्ता होती तेव्हा मुंबई महापालिकेकडे ९२ हजार कोटींचा निधी होता. आता महापालिका २ लाख कोटींच्या तोट्यात गेली असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. पुण्यातील ५ कोटी रोख पकडल्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले की, जर ते पैसे सत्ताधारी पक्षाचे असतील तर त्यामागील नाव कधीच पुढे येणार नाही.