पॉलिशच्या किटचा स्फोट
By Admin | Published: February 9, 2015 02:11 AM2015-02-09T02:11:19+5:302015-02-09T02:11:19+5:30
कार पॉलिश करण्यासाठी विकलेल्या वस्तूंचा कारमध्ये स्फोट झाल्याची खळबळजनक घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती
खालापूर : कार पॉलिश करण्यासाठी विकलेल्या वस्तूंचा कारमध्ये स्फोट झाल्याची खळबळजनक घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सारसन येथे असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंपात घडली. या स्फोटाने कारच्या मागील काचेचे तुकडे तुकडे झाले असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. तरी अशा प्रकारे पेट्रोलपंपावर स्फोटक वस्तंूची खुलेआम विक्री होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा ऐरणीवर आहे.
मुंबईतील घाटकोपर येथून राकेश कदम आपली पत्नी पेट्रोल धनश्री व मित्रांसह दु्रतगती मार्गाने होंडासिटी कारने पुणे येथे चालले होते. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारसन येथे कदम पेट्रोल भरण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पुण्याच्या मार्गावरील पेट्रोल पंपात थांबले होते. यावेळी एका कंपनीचा कार साफ करण्याचा सेट कदम यांनी कंपनीच्या विक्रेत्यांकडून विकत घेतला. हा सेट आपल्या गाडीत ठेवून कदम पुण्याकडे रवाना झाले, मात्र कार्यालयाजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता सदर किटचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की मागच्या काचेचा चक्काचूर झाला. या घटनेने कदम दांपत्य प्रचंड घाबरले. कार्ला येथून कदम पुन्हा हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावर आले व घडलेला प्रकार लाँग लाईफ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान भरून देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
या पंपावर इंधनाच्या १९ टाक्या आहेत. या ठिकाणी जर किटचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने तसे झाले नाही मात्र यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनेतर वस्तूंच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (वार्ताहर)