दारूकांडावरून पालिका सभागृहात राजकीय आखाडा

By admin | Published: June 30, 2015 01:27 AM2015-06-30T01:27:25+5:302015-06-30T01:27:25+5:30

नालेसफाईच्या चौकशीची मागणी करून शिवसेनेला कोंडीत पकडणारा मित्रपक्ष भाजपाच आज अडचणीत सापडला़ मालवणीतील विषारी दारूकांडावरून पालिकेच्या महासभेत

The Political Areas in the Municipal Hall of Barukhanda | दारूकांडावरून पालिका सभागृहात राजकीय आखाडा

दारूकांडावरून पालिका सभागृहात राजकीय आखाडा

Next

मुंबई : नालेसफाईच्या चौकशीची मागणी करून शिवसेनेला कोंडीत पकडणारा मित्रपक्ष भाजपाच आज अडचणीत सापडला़ मालवणीतील विषारी दारूकांडावरून पालिकेच्या महासभेत राजकीय वातावरण तापले़ सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपा सरकारवर जोरदार आसूड ओढले़ हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने या चर्चेस भाजपाने विरोध दर्शविला़ मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही चर्चा घडवून आणत मित्रपक्ष भाजपास जशाच तसे प्रत्युत्तर दिले़
सत्तेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपा युतीत धुमसत असलेले मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत़ स्वतंत्र पाहणी दौरे, प्रकल्पांचे उद्घाटन व श्रेयासाठी उभय पक्षांमध्ये अनेकदा कलगीतुरा रंगला आहे़ पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फुटत असताना भाजपाने नालेसफाईच्या चौकशीची मागणी करीत शिवसेनेला एकटे पाडले़ भाजपाच्या या खेळीमुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे़ यास प्रत्युत्तर देण्याची संधी शिवसेनेकडे आज चालून आली़ मालवणीत विषारी दारूने १०४ जणांचे मृत्यू झाले़ कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजपा सरकार कमी पडले़ याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेच्या महासभेत आज केली़ हा विषय पालिकेच्या अखत्यारीतील नसल्याने शिवसेनेला चर्चा टाळता आली असती़
भाजपा एकाकी
कांदिवली येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे विषारी दारू प्यायलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळाले नाहीत़ त्यामुळे मृतांचा आकडा वाढला़ त्यात या दारूकांडातील बळींच्या नातेवाइकांना एक लाख रुपये मदत देऊन भाजपा सरकारने या प्रकारांना खतपाणी घातल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला़ मात्र हातभट्टी चालविणाऱ्यांनी भाजपाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर देत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केला़
विरोधी पक्षांनी शिवसेनेला अडचणीत आणल्यावर अनेक वेळा भाजपा नेत्यांनी यापूर्वी युक्तिवाद करून मित्रपक्षाला सोडविल्याचे दिसून आले आहे़ मात्र गेल्या वर्षभरात या मैत्रीमध्ये दुफळी निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्ष भाजपाची खिल्ली उडवत असताना शिवसेना सदस्य मात्र बघ्याची भूमिका घेत याचा आनंद लुटत होते़

विरोधी पक्षांकडून भाजपाची खिल्ली
च्मुख्यमंत्र्यांनी सर्व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यापेक्षा आपल्या मित्रपक्षाकडे सोपवावीत, असा टोला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी लगावला़ तर गोवंश बंदी करण्यात आली त्याप्रमाणे दारूबंदीही करण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी भाजपा सरकारला दिले़

Web Title: The Political Areas in the Municipal Hall of Barukhanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.