लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा आणि ठाण्यातील तीन आणि पालघरच्या एका मतदारसंघात मतदान आहे. त्यानिमित्ताने मुंबई महानगर प्रदेशात प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसू लागली असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. त्याची सुरुवात रविवारीच दक्षिण मुंबईतील एका जाहीर चर्चेच्या विषयाने झाली आहे.
दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत जाहीर चर्चेचे आयोजन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्याची चर्चा रंगली. उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या पोस्टने त्याला वेगळाच रंग आला. शनिवार आणि रविवार दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दक्षिण मुंबईला आपल्या उमेदवारांमधील जाहीर चर्चा पाहता आल्या असत्या. त्यात त्यांना प्रश्नही विचारता आले असते. पण त्या शेवटच्या क्षणी रद्द झाल्या. बहुदा त्या पोलिसांमुळेच झाल्या असून त्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांमधील संभाव्य चकमकीचे कारण देण्यात आले आहे, असे या पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले.
आता ही परिस्थिती उद्भवली आहे की नागरिकांमधील चर्चाही सरकारी यंत्रणा होऊ देणार नाहीत? त्यांची जबाबदारी वेड्यावाकड्या घटना रोखण्याची आहे, चर्चा रोखण्याची नाही. आमचे उमेदवार खासदार अरविंद सावंत या चर्चेसाठी, प्रश्नोत्तरांसाठी तयार होते. आता अंदाज करा की हे कोण थांबवत आहे, असा प्रश्नही त्यांनी याद्वारे उपस्थित केला.
ठाकरे यांच्या या पोस्टवर शिंदेसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी उत्तर दिले. त्यांनीही गेले २० वर्षे आपण अशा खुल्या चर्चांमध्ये सहभागी झाल्याचे सांगत ही परंपरा जपली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले. मुंबई पोलिसांनीच ही चर्चा रद्द करायला लावली हा आरोप अपरिपक्वपणाचा असून आपल्या पोलिसांच्या लौकिकाचा अवमान करणारा आहे, असे ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार अशा चर्चेसाठी तयार असून रहिवासी संघ यासाठी तयार नसतील तर प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देवरा यांनी केले.