मुंबई : मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चा कितीही डंका वाजवू देत. मुंबई शहर, उपनगरात केल्या जात असलेल्या बॅनरबाजीने मुंबईचे विद्रूपीकरण होत आहे. राजकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा बॅनर्स, बोर्ड्स आणि पोस्टर्सचा समावेश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या खालोखाल मुंबईकरांना ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चा डोस देणाऱ्या राजकारण्यांनी, त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुभेच्छा, नियुक्त्या असे अनेक आशयाचे बॅनर्स, पोस्टर्स, बोर्ड्स नाक्यानाक्यांवर लावत मुंबई विद्रूप करण्याचा जणूकाही विडाच उचलल्याचे चित्र आहे.जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात महापालिकेकडून बॅनरबाजीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. बॅनर्समध्ये सर्वाधिक बॅनर्स हे राजकीय आहेत. बोर्डचा विचार करता सर्वाधिक बोर्ड्स हे सामाजिक आहेत. पोस्टर्सचा विचार करता सर्वाधिक पोस्टर्स हे सामाजिक आहेत. झेंड्यांचा विचार करता अशा झेंड्यांचा आकडा ७१८ आहे. अशा सगळ्या बॅनर्स, बोर्ड्स आणि पोस्टर्सचा आकडा ५ हजार ९४ असून, हा आकडा कारवाईचा आहे. म्हणजेच अद्याप असे अनेक बॅनर्स, बोर्ड्स आणि पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी झळकत आहेत. मुंबईच्या गलिच्छपणात भरच पडत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना माहिती अधिकाराखाली अंतर्गत प्राप्त कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.दाद मागणारआम्ही किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयात दिले होते. तरी आजही राजकीय पक्षांचे बॅनर्स जागोजागी दिसतात. यासंदर्भात मुंबई शहर, उपनगराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच न्यायालयात दाद मागणार आहे.- शरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ता
कोरोना काळातही बॅनर्स झळकलेकोरोनाला हरविण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. गेल्या दोन-एक महिन्यात लॉकडाऊन शिथिल होत असतानाच काही राजकीय पक्षांची मुंबई स्तरावरील पदांची घोषणा झाली. यात जिल्हा स्तरापासून विधानसभा स्तरावरील पदांचा समावेश होता. राजकीय पक्षांकडून पदांची घोषणा होते तोच नाक्यानाक्यावर शुभेच्छुकांनी आपले संदेश संबंधितांना दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शुभेच्छुकांमध्ये उद्योजक, व्यापारी, कंत्राटदार यासारख्या घटकांचा समावेश होता. नाक्यानाक्यावर असे अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात, झळकविण्यात चक्क स्पर्धा सुरू होती. रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात अशा बॅनर्सचा भरणा अधिक होता.