Join us

राज्यसभेत दिलेल्या घोषणेला आक्षेप घेतल्यावरून राजकीय वादंग; संभाजी ब्रिगेड, शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:48 AM

सभागृहात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’, अशी त्यांना समज दिली.

मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणा दिली. त्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतलेल्या आक्षेपावरून राजकारण चांगलेच तापले आहे.या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने भाजपला टिकेचे लक्ष्य केले आहे.

राज्यसभेत बुधवारी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यावर त्याला जोडूनच ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यास आक्षेप घेत सभापती नायडू यांनी, ‘तुम्ही या सभागृहात नवीन आहात म्हणून सांगतो, फक्त तुमची शपथ नोंदविली जाईल. इतर काही रेकॉर्डवर जाणार नाही.

सभागृहात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’, अशी त्यांना समज दिली. यावरून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. ‘आता भाजपचे तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही,' असा प्रश्न ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला. मात्र, राऊत यांनी नायडू यांना क्लीनचिट दिली.

व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची आहे,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडने पोस्टर जाळले

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड व शिवसेने या प्रकारावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेडने भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर व्यंकय्या नायडू यांचे पोस्टर जाळत भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात घोषणाबाजी क रीत त्यांना एक लाख पत्रे पोस्टाद्वारे पाठविण्याला सुरुवात केली आहे. 

सांगलीत रंगले पत्रयुद्ध

सांगली : राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी टीका केल्यानंतर सांगलीतील भारतीय जनता युवा मोर्चाने शरद पवारांना ‘जय श्री राम’ लिहिलेली एक हजार पत्रे पाठविली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने जिल्ह्यातून ‘जय शिवाजी’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ लिहिलेली एक लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यसभेत शपथ घेतानाचे फुटेज सर्वांच्याकडे आहे. हे फुटेज पाहिल्यानंतरच जो काय सोक्ष-मोक्ष व्हायचा तो होईल. खासदार शरद पवार तिथे होते. हवं तर त्यांना या घटनेबाबत विचारा. जे घडलंच नाही, त्याबाबत विनाकारण राजकारण केलं जात आहे.- उदयनराजे भोसले, खासदार

मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा खंदा व उघड प्रशंसक आणि भवानी मातेचा भक्त राहिलो आहे. शपथ घेताना कोणतीही घोषणा न देण्याची रुढ परंपरा आहे, याचे मी सदस्यांनी स्मरण करून दिले. त्यात (कोणाचाही) अजिबात अपमान नव्हता.- एम. व्यंकय्या नायडू, सभापती, राज्यसभा

टॅग्स :उदयनराजे भोसलेव्यंकय्या नायडू