Join us

औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद;मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा उकरून काढल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:32 AM

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा उकरून काढल्याचा आरोप

मुंबई/औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून आता राजकीय वाद पेटला असून कॉंग्रेस पक्षाने या नामांतरास विरोध करतानाच विमानतळाच्या नामांतराचे काय झाले, असा सवाल भाजपला केला आहे, तर भाजपने नामांतराच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नामांतराचा हा वाद उकरुन काढण्यात येत आहे.  न्यायालयात दाखल एका याचिकेच्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने ४ मार्च २०२० रोजी पाठवलेल्या एका जुन्या पत्राचा संदर्भ देत या वादाला हवा देण्यात आली. शहराच्या नामांतराचा विषय तसा खूप जुना आहे. १९९० साली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या सभेत औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची हाक दिली होती.

त्यानंतर जून १९९५ मध्ये औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. दरम्यान, राज्यात शिवसेना- भाजपा युतीचे सरकार होते. सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत नामांतराला आव्हान  दिले. पुढे १९९९ साली राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करण्याच्या प्रस्तावाला ब्रेक लागला. २०१४ साली राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना- भाजपा युती सत्तेत आल्यानंतर नामकरणाच्या प्रस्तावाला पुन्हा हवा मिळाली; परंतु त्यावर निर्णय झाला नाही.  

मनपा निवडणुकीच्या तोंडावर नामकरणावरून राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ पेटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहराचे नामकरण करण्याचा विषय महाआघाडी सरकारच्या सामायिक कार्यक्रमामध्ये नसल्याचे स्पष्ट करत शहर नामकरणास विरोध दर्शविला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एमआयएम मात्र याचे निवडणुकीच्या दृष्टीने भांडवल करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :औरंगाबादमहाराष्ट्र सरकारकाँग्रेसशिवसेना