मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० च्या आसपास आमदारांनी बंडाळी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरांना शिवसेना नेत्यांकडून इशारे दिले जात आहेत. विमानतळावरून विधान भवनात जाणारा रस्ता वरळीत जातो असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. तर बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असे आव्हान आमदार सचिन अहिर यांनी दिले होते. त्याला आता शिवसेनेचे कट्टर वैरी असलेल्या निलेश राणे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. रोड टेस्टची वार्ता करू नका बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
काल पुण्यात एका मेळ्याव्यात संबोधित करताना सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले होते. कमळीच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. विधिमंडळात फ्लोअर टेस्टमध्ये काय व्हायचे ते होईल, पण रोड टेस्टमध्ये काय होतेय ते पहा, तुम्ही मतदारसंघांत तोंड दाखवू शकणार नाही, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला होता.
सचिन अहिर म्हणाले की, शिवसेना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही आम्हाला संपविण्याचा प्रयत्न कराल, त्या त्या वेळी शिवसेना पुन्हा भरारी घेईल. सत्ता तुम्हाला मिळेल, मोठी पदे मिळतील, पण ज्यांनी बंडखोरी केली, तुम्ही संपूर्ण विचार, पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहात. जर हिंमत असेल तर प्रथम आमदारकीचा राजीनामा द्या, मग लोकांसमोर जाऊन सांगा, असे आव्हानही त्यांनी दिले.