Join us

'मराठी शाळा बंद पाडण्याचे राजकारण उधळून लावणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:43 AM

गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात मराठी शाळांना सापत्न वागणूक मिळत आहे. मराठी शाळांकडे दुर्लक्ष होते आहे, तसेच मराठी शाळांच्या जागांवर इंटरनॅशनल शाळा सुरू करण्याचे राजकारण सुरू आहे

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात मराठी शाळांना सापत्न वागणूक मिळत आहे. मराठी शाळांकडे दुर्लक्ष होते आहे, तसेच मराठी शाळांच्या जागांवर इंटरनॅशनल शाळा सुरू करण्याचे राजकारण सुरू आहे. मात्र, हा राजकीय डाव उधळून लावणार आहोत. मराठीप्रेमी पालक महासंमेलनात स्थापन करण्यात आलेल्या ‘मराठी प्रेमी पालक संघा’ने ही बाब स्पष्ट केली.मराठी शाळांना मिळणारा अपुरा निधी, राजकारण्यांनी केलेले दुर्लक्ष, पालकांची बदलेली मानसिकता अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी संख्येत घट झाली आहे. याचा फटका मराठी शाळांना बसत आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी महासंघाची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. महासंघ पालिकेच्या अखत्यारितील मराठी शाळा बंद करण्याच्या कारस्थानाविरोधी लढा उभा करणार आहे. त्यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.सरकारकडून मराठी माध्यमाच्या शाळांना मिळणारे अनुदान कमी होत असताना, मराठी शाळांची गुणवत्ता व सोईसुविधा टिकविणे हे आव्हान आहे. ते पेलायचे असेल, तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटीअंतर्गत विविध कंपन्यांकडून निधी उभारावालागेल, असे मत शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे विश्वस्त-अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.मराठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी शाळांच्या व्यवस्थापनाशीही महासंघ संपर्कात राहणार आहे. सरकारने मराठी शाळांच्या स्थितीचा अहवाल मांडणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणार नाही, यासाठी ठोस भूमिका घ्यावी, शाळा बंद करण्याचा निर्णय स्थगित करावा, मराठी शाळांचा रद्द केलेला बृहद् आराखडा पुन्हा लागू करावा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मूल्यमापन करावे इत्यादी प्रमुख मागण्या असल्याचे संमेलनात सांगण्यात आले.