Join us  

महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 5:21 AM

वर्षा गायकवाड यांनी स्वतःसह सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे या पदासाठी घेत ‘महिला कार्ड’ पुढे केले आहे.

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे. काँग्रेसमध्ये माझ्यासह चार-पाच जणींच्या नावाचा विचार होऊ शकतो. मित्र पक्षांतील सुप्रिया सुळे, रश्मी उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केले तरी चालेल, असे विधान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी केल्याने पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का, ही चर्चा सुरू झाली आहे.

या स्पर्धेत काही महिला नेत्या असल्याचे त्या-त्या वेळी चर्चेत आले. पण, प्रत्यक्ष संधी कोणालाही मिळाली नाही. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे विधान भाजपच्या पंकजा मुंडे यांनी पूर्वी केले होते. आता वर्षा गायकवाड यांनी स्वतःसह सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे या पदासाठी घेत ‘महिला कार्ड’ पुढे केले आहे.

संधी दिल्यास मलाही आवडेल...

पक्षाने संधी दिल्यास मुख्यमंत्री झालेले मलाही आवडेल, असे विधान वर्षा गायकवाड यांनी ‘न्यूज १८ लोकमत’शी बोलताना केले. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महाविकास आघाडीने आधी जाहीर करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. काँग्रेस, शरद पवार गटाने त्यास विरोध दर्शविला होता. आता गायकवाड यांनी महिलेला ती संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. महायुती सरकारने एकाच महिलेला मंत्रिपद दिले. मविआ सरकारमध्ये दोघी कॅबिनेट व एक राज्यमंत्री होत्या, असे त्या म्हणाल्या.

रश्मी ठाकरे यांनी राजकारणात कधीही रस घेतलेला नाही. त्या नेहमी त्यांच्या पतीसोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात आहेत, असा होत नाही. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. पण, कारण नसताना रश्मी ठाकरे यांचे नाव त्यात घेऊ नये.

- किशोरी पेडणेकर, उद्धव सेनेच्या नेत्या, माजी महापौर

केवळ महिला मुख्यमंत्री झाल्याने प्रश्न सुटणार आहेत, असे नाही. सक्षमपणे प्रशासन सांभाळणारा माणूस असेल आणि खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेणारे असतील, तर अजित पवार मुख्यमंत्री झालेले आम्हाला पाहायला आवडेल.

- रुपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्षा, अजित पवार गट

महिलेला कोणतेही पद द्यायला काहीही हरकत नाही. पद सांभाळण्याची क्षमता आहे का,  हे पाहायला हवे. कुणीही म्हटले तरी महिला मुख्यमंत्री होऊ शकते का? अखेरीस त्याचा निर्णय आमदार घेत असतात. पक्षाच्या नेत्याने निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री झाले असे होत नाही.

- डॉ. नीलम गोऱ्हे,  उपसभापती विधान परिषद

टॅग्स :विधानसभानिवडणूक 2024