राजकीय समीकरण बदलणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 06:00 AM2017-08-19T06:00:00+5:302017-08-19T06:00:02+5:30
काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप प्रभाग क्रमांक ११६मध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
मुंबई : काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप प्रभाग क्रमांक ११६मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. मात्र पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्याने ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपाच्या जागांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणूक २०१७मध्ये (दोन अपक्ष मिळून) भाजपाचे ८४ तर शिवसेनेचे (चार अपक्ष मिळून) ८८ नगरसेवक आहेत. मुख्यमंत्र्यांचे पद वाचविण्यासाठी भाजपाने महापौर निवडणुकीत माघार घेतली. मात्र पोटनिवडणुकीने सत्तांतराची संधी आणल्याने भाजपा या वेळेस हार मानण्यास तयार नाही. प्रभाग क्रमांक ११६मधून भाजपा पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत करून अप्रत्यक्ष संकेतच दिले आहेत.
फेब्रुवारी २०१७मध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांचा विजय झाला होता. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि सून जागृती पाटील यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील ८४-८२ समीकरण बदलणार असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.
प्रतिष्ठा पणाला
पाटील यांनी मतदार संघात बरेच काम केले आहे. त्यामुळे ही जागा त्यांच्याच घराण्याला मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्याने या पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी होईल अशी भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे शिवसेना धास्तावली असून निवडून येण्यासाठी भाजपा सरसावल्याचे चित्र आहे.
>सध्याचे पालिकेतील संख्याबळ
शिवसेनेला ८४ व चार अपक्ष मिळून ८८
भाजपा ८२ व दोन अपक्ष मिळून ८४
काँग्रेस ३१
राष्ट्रवादी ७
मनसे ७
अपक्ष ८