पुनर्रचनेच्या तडाख्याने बदलली राजकीय समीकरणे
By admin | Published: November 16, 2016 04:57 AM2016-11-16T04:57:22+5:302016-11-16T04:57:22+5:30
मतदारसंघ पुनर्रचना आणि नव्या आरक्षण सोडतीमुळे पालिका राजकारण ढवळून निघाले आहे. मुंबई शहरातील मतदारसंघांत झालेल्या
मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना आणि नव्या आरक्षण सोडतीमुळे पालिका राजकारण ढवळून निघाले आहे. मुंबई शहरातील मतदारसंघांत झालेल्या कपातीमुळे सर्वच वॉर्डांची रचना बदलून गेली आहे. जी साऊथ वॉर्डातील बदलांमुळे महापौर स्नेहल आंबेकरांसह नाना आंबोलेंसारख्या दिग्गज नगरसेवकांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील पालिका निवडणुकीत जी साऊथ वॉर्डातून शिवसेनेने चार जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. पुनर्रचनेनंतर येथील सर्वच समीकरणे बदलली आहेत. २०१२ साली मनसेच्या मराठी लाटेतही शिवसेनेने येथील चार प्रभाग स्वत:कडे राखण्यात यश मिळविले होते. यंदा मनसेची लाट नसली तरी पुनर्रचनेचा त्सुनामी मात्र सर्वच प्रभागांतील प्रमुख उमेदवारांना अनुभवावी लागत आहे. प्रभागांची झालेली मोडतोड आणि नव्याने समाविष्ट झालेले मतदार अशा कात्रीत शिवसेना सापडली आहे. थोड्याफार प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थितीदेखील तशीच आहे. अनेक वर्षे निगुतीने केलेले राजकारण आणि जपलेला मतदार भलत्याच प्रभागात गेल्याने नव्या मतदाराशी जुळविण्याची कसरत सुरू झाली आहे.
कामगार वर्ग आणि मराठीचा तोंडओळख असणारा हा वॉर्ड पुनर्रचनेनंतर मात्र बहुआयामी बनला आहे. कामगार वर्गापासून उच्चभ्रू सोसायट्या, आगरी -कोळीवाड्यांपासून दलित वस्त्या आणि नोकरदार वर्गाचा समावेश अशा प्रकारे वैविध्यपूर्ण प्रभाग तयार झाले आहेत. (प्रतिनिधी)