मुंबई : मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी असलेले कबुतरखाने आता येत्या काही दिवसांत पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक विकारांना सामोरे जावे लागत असल्याने मनसेने ते हटविण्याची मागणी केली आहे, तर भाजपा कबुतरखान्याच्या संरक्षणासाठी सरसावली आहे.भरवस्तीमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दादर येथील कबुतरखाना बंद करण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्याला विरोध करीत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी कबुतरखान्याचे अस्तित्व जपण्याचा आग्रह धरला आहे.भारतात एकूण लोकसंख्येपैकी सुुमारे १० टक्के लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे विकार होतात. त्यामध्ये जवळपास तितक्याच टक्के नागरिकांना हा त्रास कबुतरांमुळे होतो. त्यांच्या विष्ठा व पिसामुळे हा विकार होतो. वाळलेल्या विष्ठेतून ‘अँस्परजिलस फंगस’ होऊन अॅलर्जी आणि दम्याचा त्रास होतो. बंद जागेत कबुतरांची विष्ठा बरेच दिवस राहिल्यास त्यातून अमोनिया गॅस निर्माण होऊन श्वसनाचे आजार होतात. त्याचप्रमाणे कबुतराच्या बॉडीतील सीरम विष्ठेतून बाहेर पडून ‘हायपर सेन्सिटीव्हीटी न्यूमोनायट्रेस’आजार होऊन दम लागणे, खोकला, थकवा निर्माण होतो, असे डॉ. सितेश रॉय यांनी सांगितले.स्पेनमधील प्रयोग मुंबईत राबवाएक कबुतराची जोडी वर्षाला ४८ पिलांना जन्म देते. त्यामुळे कबुतरांची संख्या मुंबईत प्रचंड प्रमाणात वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी खाद्यातून ओविस्टॉप हे औषध दिल्यास त्यांची प्रजनन क्षमता थांबते. हा प्रयोग स्पेनमध्ये केला जातोय. असाच प्रयोग मुंबईतही राबवल्यास नक्कीच कबुतरांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी मात्र त्यातून ‘राजकारण’ सुरू केल्याने मूळ समस्या तशीच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दादरमधील कबुतरखान्यावरून राजकारण तापणार
By admin | Published: June 12, 2017 12:27 AM