माहीमच्या लसीकरण केंद्रावर ‘राजकीय घुसखोरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:36+5:302021-04-28T04:06:36+5:30
ज्येष्ठ नागरिकांचा आरोप; परिचयातील व्यक्तिंना दिला जातो रांगेविना प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माहीममधील लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्त्यांकडून ...
ज्येष्ठ नागरिकांचा आरोप; परिचयातील व्यक्तिंना दिला जातो रांगेविना प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीममधील लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्त्यांकडून घुसखोरी सुरू असून, परिचयातील व्यक्तिंना रांगेविना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे, असा आराेप करत, या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी या केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली.
पालिकेच्या जी उत्तर विभागाचे अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी या केंद्रावर नियोजनपूर्वक काम करीत आहेत. रांगेत उभे असलेल्या प्रत्येक नागरिकाला लवकरात लवकर लस देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून येथे राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते येथे स्वतःच्या मर्जीतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी मनमानी करीत आहेत. पालिकेने कंत्राटी तत्त्वावर नेमलेले काही कर्मचारी त्यांना या कामात मदत करीत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तासनतास रांगेत उभे असलेल्या नागरिकांना लस संपल्याचे सांगून परत पाठविले जाते आणि त्यानंतर राजकीय व्यक्तींच्या मर्जीतील लोकांना केंद्रात प्रवेश देऊन त्यांचे लसीकरण केले जाते. त्याचप्रमाणे भलीमोठी रांग लागलेली असताना राजकीय पुढारी आपल्या परिचयातील लोकांना थेट प्रवेश देत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब जी उत्तर विभागाच्या आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. असे प्रकार तातडीने रोखावेत आणि संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे विहिंपचे प्रशांत पळ यांनी सांगितले.
* व्हीआयपी टोकनचे गौडबंगाल काय?
व्हीआयपी टोकन घेऊन काहीजण रांगेविना लसीकरण केंद्रात प्रवेश करीत आहेत. अशा प्रकारचे टोकन बनविण्याचे आदेश कोणी दिले, यामागे काही राजकीय शक्ती कार्यरत आहेत का, याबाबत माहिती द्यावी. तसेच केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विहिंपने केली आहे.
* घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई
लसीकरण केंद्रावरील स्वयंसेवक परिचितांना रांगेविना प्रवेश देत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पालिकेचे अधिकृत कर्मचारीवगळता अन्य कोणालाही आत न घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. ही बाब पोलिसांनाही कळवली आहे.
- किरण दिघावकर,
सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग
.......
फोटो – व्हीआयपी टोकन.