दिवाळीत राजकारण्यांची घुसखोरी
By Admin | Published: October 25, 2016 04:33 AM2016-10-25T04:33:49+5:302016-10-25T04:33:49+5:30
गणेशोत्सव, नवरात्रौत्सवापासून गोविंदात येनकेन प्रकारे शिरकाव करणाऱ्या राजकीय नेत्यांनी यंदा दिवाळीच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार तयारी चालविली
मुंबई : गणेशोत्सव, नवरात्रौत्सवापासून गोविंदात येनकेन प्रकारे शिरकाव करणाऱ्या राजकीय नेत्यांनी यंदा दिवाळीच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. आकाशकंदिलापासून अभ्यंगस्नानासाठी लागणारे सुगंधी उटणे थेट लोकांच्या घरी पोहोचविण्याचा कार्यक्रम विविध राजकीय नेत्यांनी चालविला आहे.
प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध क्लृप्त्याही लढविण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, साईबाबांच्या महासमाधी शताब्धी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांना देणग्या, सोयीसुविधा पुरवत सार्वजनिक उत्सव मंडळांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांनी केला. या उत्सवानंतर आता पुढाऱ्यांची नजर दिवाळसणाकडे वळली आहे. मात्र, दिवाळीचा उत्सव कौटुंबिक स्तरावर साजरा होत असल्याने विविध माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून सुरू आहे. एरवी सार्वजनिक ठिकाणी आकाशकंदील आणि शुभेच्छाफलक लावण्यात धन्यता मानणाऱ्या नेते मंडळींनी यंदा भेट रूपाने थेट सुंगंधी उटणे, सुवासिक साबण घरोघरी पोहोचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून माफक दरात फराळ विक्री केंद्रेही चालविण्यात येत आहेत. दादरसारख्या गजबजलेल्या परिसरातही अशी फराळविक्री केंद्रे चालू आहेत. माफक दर आणि महिला बचत गटांच्या सहभागामुळे अनेक ग्राहक विश्वासाने या फराळाची खरेदी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे ग्राहकांना माफक दरात फराळ तर दुसरीकडे महिला बचत गटांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे दुहेरी हेतू राजकीय संघटना व व्यक्ती साध्य करीत आहेत. प्रत्येक ठिकाणी संबंधित नेता त्याचा पक्ष त्याच्या पक्षाचे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबेल याची काळजी घेण्यात येत आहे. शिवसेनेचा आकाशकंदील, स्टॉल वगैरे संपूर्ण भगव्या रंगात असतात तर भाजपाच्या आकाशकंदिलासाठी केशरी आणि हिरव्या रंगाची जोडगोळी असते. तिरंगी रंगातून काँग्रेस तर चौरंगी पट्ट्यातून मनसे आणि त्यांचे नेते झळकत असतात. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या रणसंग्रामापूर्वी दिवाळी हा शेवटचा मोठा उत्सव असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष, व्यक्तींनी सर्व शक्ती पणाला लावल्याचे चित्र दिसून येत आहे.