Join us

नवरात्रोत्सवात राजकीय जागर; भाजप आणि ठाकरे गटासह शिंदे गटात चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:33 AM

विविध पक्षांचे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबापुरीत गरबा रसिकांचा फेर सुरू असतानाच दुसरीकडे शहर आणि उपनगरातल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना हाताशी धरत राजकीय पक्षांनी येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. 

बहुतांशी मंडळांना आपलेसे करत प्रवेशद्वारांसह फ्लेक्स लावण्यात सध्या तरी भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून, त्या खालोखाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला नंबर लावला आहे. स्वत:चे प्रमोशन करण्याच्या या स्पर्धेमुळे नवरात्रोत्सवाला राजकीय स्वरूप आले आहे.ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वरळी मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भाजपचे फ्लेस लागले आहेत.

या प्रवेशद्वारांसह फ्लेक्सवर भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि ॲड्. आशिष शेलार यांचे चेहरे झळकत आहेत. कलिना विधानसभा क्षेत्रात मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजहंस सिंह मुलगा नितेश सिंह यांनी कुर्ला परिसरातील बहुतांशी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी प्रवेशद्वार लावले आहेत. या प्रवेशद्वारांवर खासदार पूनम महाजन यांच्यासह विधानसभा स्तरावरील नेत्यांचे फोटो लावले आहेत.

 चांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ला कमानी सिग्नलवर लक्ष जाईल, असा फ्लेक्स लावला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे.प्रतिस्पर्धी आणि माजी मंत्री नसीम खान यांनी येथेच शुभेच्छा देणारा भलामोठा फ्लेस लावला असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापासून विधानसभा स्तरावरील नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यातील बहुतांशी फ्लेक्स, प्रवेशद्वारे हे शुभेच्छाकांनी लावले असून, बहुतांशी शुभेच्छुक हे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक असल्याची राजकीय चर्चा वॉर्ड स्तरावर रंगली आहे.

चेंबूर परिसरात शिंदे गटाने आघाडी घेतली असून, शुभेच्छुकांनी दसऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो फ्लेक्सवर लावत लक्ष वेधले आहे. तर काही ठिकाणी ठाकरे गटाचे बॅनर्स लागले असून, यावर एकनिष्ठ अशा शब्दप्रयोग करत विरोधकांवर मात करण्यात आली आहे.

 खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. अनिल परब, आ. पराग अळवणी, आ. अमित साटम, आ. भारती लव्हेकर, आ. रवींद्र वायकर, आ. सुनील प्रभू, आ. अतुल भातखळकर, आ. प्रकाश सुर्वे, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, आ. मनीषा चौधरी, उबाठाचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, तसेच विविध एनजीओ यांचे त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत.

टॅग्स :शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरे