लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकविरा देवी संस्थान विश्वस्त मंडळावर नेते, गुन्हेगार नकोच. कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद असलेल्या आणि राजकीय पद धारण केलेल्या व्यक्तींची वर्णी येथे लावू नका, असे आदेश देत उच्च न्यायालयाने राजकीय साठमारीला चाप लावला आहे.
अलीकडे देवी-देवतांचे ट्रस्ट म्हणजे राजकीय आखाडे बनले आहेत, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने राजकीय नेते व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक वगळून जे उमेदवार अर्ज करतील त्यांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्याचे आदेश संस्थानाला दिले. ही सर्व प्रक्रिया प्रोथोनोटरीच्या देखरेखीखाली चालेल, असेही न्या. एस. बी. शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. एकविरा देवस्थानच्या संचालक मंडळाची निवडणूक गोपनीय बॅलेट पेपर पद्धतीने घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका चेतन पाटील यांनी ॲड. युवराज नरवणकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल केली.
या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने भक्तांनाच ही संधी द्यावी, असे मत व्यक्त केले. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे पोलिस रेकॉर्ड तपासावे त्यानंतर गुणात्मक पद्धतीने इच्छुक उमेदवारांची यादी तयार करावी आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या दोघांची ट्रस्टवर निवड करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. दरम्यान, न्यायालयाने २९ ऑगस्ट रोजी होणारी संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलली.