मुंबई - विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न सुरू केलेत. महाविकास आघाडीत मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ असेल हे स्पष्ट झालंय. त्यात मुंबईतल्या शिवडी मतदारसंघात उद्धव ठाकरे कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू आहे. सध्या या मतदारसंघात अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत. पक्षफुटीनंतरही अजय चौधरींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.
मात्र आता शिवडी मतदारसंघातून अजय चौधरींचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी लालबागचा राजा गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे इच्छुक आहेत. साळवी यांनी त्याप्रकारे मतदारसंघात बॅनरबाजी करण्यासही सुरुवात केली आहे. त्यातच 'लालबागचा राजा'चरणी सुधीर भाऊ साळवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून २०२४ ला आमदार व्हावेत असं पत्र सापडलं. त्यामुळे साळवींच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली. याबाबत स्वत: सुधीर साळवींनीही सूचक विधान माध्यमांशी बोलताना केले आहे.
काय म्हणाले सुधीर साळवी?
गेल्या अनेक वर्षापासून मी लालबागचा राजाची सेवा करत आहे. त्याची सेवा करणं हे भाग्य माझ्यासाठी मोठं आहे. बाकी पदे येतात, जातात, मी लहानपणापासून लालबागमध्ये राहतोय असं साळवींनी म्हटलं. त्यावर तुम्हाला आमदार होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा इच्छा महत्त्वाकांक्षा असणं काही चुकीचे नाही. लालबागचा राजा माझ्याकडून सेवा करून घेतोय आणि कार्यकर्त्यांची फौज माझ्यासोबत आहे यातच समाधान आहे. राजाचा आशीर्वाद मला अनेक वर्ष लाभला आहे असं विधान सुधीर साळवींनी केले आहे.
अजय चौधरींना उमेदवारी नाकारणार?
अजय चौधरी हे शिवसेना ठाकरे गटाचे शिवडीतील विद्यमान आमदार आहेत. ते कट्टर शिवसैनिक असून २०१४ साली ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा ठाकरेंनी चौधरींना उमेदवारी दिली तेव्हाही ते विजयी झाले. २००९ मध्ये मनसेचे बाळा नांदगावकर या मतदारसंघात निवडून आले होते. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत याठिकाणी शिवसेना-भाजपा युतीमधून अजय चौधरी निवडून आले. त्यामुळे सलग १० वर्ष आमदार असलेले अजय चौधरी यांना डावलून उद्धव ठाकरे सुधीर साळवींना उमेदवारी देणार का हे आगामी काळात कळेल.
मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत थेट सामना
निवडणूक घोषित होण्यापूर्वी या मतदारसंघात मनसेनं पुन्हा एकदा बाळा नांदगावकरांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे बाळा नांदगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. २०१९ च्या निवडणुकीत बाळा नांदगावकरांनी माघार घेतल्याने इथं मनसेने संतोष नलावडे यांना उभे केले. मात्र त्यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागले. शिवडी मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत थेट लढत होणार आहे.