Join us  

पालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा घोळ

By admin | Published: October 13, 2014 11:57 PM

माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून पुन्हा एकदा तेढा निर्माण झाली आहे.

पुणो : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून पुन्हा एकदा तेढा निर्माण झाली आहे. मानकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांचे पद रद्द होण्याची शक्यता असल्याने महापालिकेत पुन्हा एकदा मनसे आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांची संख्या समान होणार आहे. त्यामुळे हे पद कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. 
महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. कॉंग्रेसचे 29 नगरसेवक असल्यामुळे त्यांचे अरविंद शिंदे हे विरोधी पक्षनेते आहेत. सन 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर मनसेचे 29 तर कॉंग्रेसचे 28 नगरसेवक होते. त्यामुळे हे पद मनसेला देण्यात आले होते. मात्र, निवडणुकांनंतर मागील वर्षी मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद रद्द झाले.  
त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय पक्ष असल्याने हे पद कॉंग्रेसला देण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा मनसेच्या दुस:या नगरसेविका कल्पना बहिरट यांचेही पद रद्द झाले. या वेळी मनसेचे 27 तर कॉंग्रेसचे 28 नगरसेवक होते. 
या दोन्ही पदांवर झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागा मनसेला तर एक काँग्रेसला मिळाल्याने कॉंग्रेसचे 29 तर मनसेचे 28 नगरसेवक पालिकेत होते. मात्र, आता पुन्हा मानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या समान झाली आहे.(प्रतिनिधी)
 
मनसेला पद देण्याची मागणी 
दरम्यान, महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावे, अशी मागणी 
पक्षाचे गटनेते वसंत मोरे यांनी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन्ही पक्षांची समान संख्या असल्याने हे पद मनसेला द्यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.