भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले
By मनोहर कुंभेजकर | Published: November 18, 2023 04:58 PM2023-11-18T16:58:17+5:302023-11-18T17:00:12+5:30
सामना जसा पुढे रंगत जाईल तसतशा कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या टाळ्या- घोषणा- चित्कार यांतून भावनिक ओहोटी-भरतीचं अदभूत दर्शन घडेल.
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपण 'क्रिकेटचा देव' म्हणतो कारण भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे धर्मच! एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला भारतीय संघ उद्या ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात उतरेल तेव्हा कोट्यवधी भारतीय आपसूक 'भारतमातेचा जयजयकार' करतील. रस्ते निर्मनुष्य होतील. सामना जसा पुढे रंगत जाईल तसतशा कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या टाळ्या- घोषणा- चित्कार यांतून भावनिक ओहोटी-भरतीचं अदभूत दर्शन घडेल.
उद्याची वर्ल्ड कप फायनल याची देही याची डोळा बघण्यासाठी आणि उद्या मुंबईच्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांना ही मॅच लाईव्ह दाखवण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था,गृहनिर्माण संस्था देखिल सरसावल्या आहेत.
या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी चुकवून कसं चालेल? म्हणून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'दीपोत्सवा'च्या लखलखाटाच्या पार्श्वभूमीवर 'भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया' सामना खास क्रिकेटप्रेमी रसिकांसाठी दादरच्या 'शिवतीर्था'जवळ केळुस्कर मार्ग आणि एम.बी. राऊत मार्ग यांच्या जंक्शनवर (शारदा पान - जिप्सी हॉटेल चौकात) एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लोकमतला दिली.
उद्या दुपारी दीड पासून कांदिवली पश्चिम पोईसर जिमखाना येथे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 20 x 12 फूट मोठ्या एलईडी स्क्रीनवर उद्याच्या क्रिकेट विश्व कप फाइनलचे लाईव्ह टेलिकास्ट केले आहे.आपण नरेंद्र मोदी स्टेडियम वरची ही फायनल मॅच बघण्यासाठी आपण आपल्या परिवारा सह यावे असे आवाहन पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी यांनी उत्तर मुंबईच्या नागरिकांना केले आहे.
शिवसेना शाखा क्रमांक 84 येथे क्रिकेट मॅच चे भव्य मोठ्या स्क्रीनवर आयोजन करण्यात येणार आहे.विलेपार्ले पूर्व शहाजीराजे रोड येथे या शाखेच्या शेजारी रस्त्यावर मोठा स्क्रीन लावण्यात येणार असल्याची माहिती उबाठाचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक व आयोजक नितीन डीचोलकर यांनी दिली. तर गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उद्या क्रिकेट मॅच चे आयोजन शहाजी राजे रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील ओम साई विश्वकर्मा दर्शन सोसायटीमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावून करण्यात येणार असल्याची माहिती डीचोलकर यांनी दिली.
आपला विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने बोरिवली पश्चिम गोराई 2 येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण,आर.एम.सी.48,गोराई 2 येथे एलईडी लाईव्ह स्क्रीन वर उद्याच्या क्रिकेट विश्व कप फाइनलचे लाईव्ह टेलिकास्ट केले आहे अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली.