Join us

राजकीय पक्षांमध्ये सुरू होती खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:59 AM

ईव्हीएम मशीनवरून वाद : निकालापूर्वी सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्यावर आला असताना राजकीय पक्षांमधील समाजमाध्यमावरील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. संबंधित पक्षांचे पाठीराखे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडत आहेत. भाजपने २०१४ मध्ये सुरू केलेले ‘डिजिटल युद्ध’ आता एकतर्फी राहिलेले नाही. दररोज बदलणाऱ्या वादाचा ट्रेंड निकालाच्या आदल्या दिवशी ईव्हीएमच्या संशयापर्यंत रंगला.

देशात पहिल्यांदा सोशल मीडियाची ताकद भाजपने ओळखली. त्यानंतर भाजपने विरोधी पक्षांना आव्हान देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. आता याच सोशल मीडियाचा वापर करून विरोधक भाजपला धारेवर धरत आहेत.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाल्याचे दाखविल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीच मिठाईच्या आॅर्डरी दिल्या आहेत. तर या एक्झिट पोलनंतर विरोधी पक्षांनी वोटिंग मशीनवर आक्षेप घेत ५० टक्के मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली. समाजमाध्यमावरही याचे पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप नेते ईव्हीएम मशीनचे समर्थन करीत आहेत तसेच भाजप कार्यकर्तेही फेसबुकवर उत्तर देत आहेत.

ईव्हीएम मशीनचा विरोध म्हणजे जनतेने दिलेल्या कौलाचा अनादर आहे. पराभवाच्या भीतीने देशातील २२ पक्ष गोंधळून गेले आहेत; त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित करीत आहेत. एवढेच नव्हेतर, या पक्षांमुळे आपल्या देशाची जगभरातील प्रतिमा मलिन होत आहे, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, आगामी २४ तास खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष राहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा.निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करीत आहे त्यामुळे लोकांच्या मनातील शंका अजून वाढू लागल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेसबूकवर केली आहे.पोलवरूनच मंत्रिपदभाजप उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग असून काही कार्यकर्ते एक्झिट पोलवरूनच मंत्रिपद मागतील, असा टोला लगावला आहे. एक्झिट पोलवरूनच मंत्रिपद मागतील, अशा आशयाची ‘आप’ची पोस्ट व्हायरल होत आहे. निकालांनंतरही हे सोशल वॉर सुरूच राहील असे चित्र आहे़ त्याची चर्चा अधिक होती़