Join us

राजकीय पक्षांची मुंबईवर नजर

By admin | Published: July 19, 2014 1:28 AM

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शिवसेना शाखांना भेटी देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही तयारीला लागली आहे. मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक दाखल झाले आहेत. प्रत्येक मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेऊन तो अहवाल हायकमांडला सादर केला जाणार आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने हा आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील सर्व जागांचा आढावा घेण्यासाठी पाच निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील एक निरीक्षक १७ जुलै रोजी मुंबईत दाखल झाले असून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. बोरीवली, ओशिवरा, मालाड, कांदिवली, दिंडोशी आणि जोगेश्वरी मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार, विद्यमान आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याशी व्यक्तिगत चर्चा करून निरीक्षक आपला अहवाल तयार करतील.२८ जुलैपर्यंत ३६ मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. एका निरीक्षकाकडे जवळपास ६ ते ७ मतदारसंघ देण्यात आले आहेत. या निरीक्षकांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केला जाणार आहे. मुंबई काँग्रेसकडे केवळ निरीक्षकांच्या दौऱ्याचे नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे, असे मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)