निवडणूक प्रचार साहित्य खरेदीकडे राजकीय पक्षांचे अद्याप दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:17 AM2019-04-04T01:17:51+5:302019-04-04T01:18:04+5:30

दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत : पक्षचिन्ह असलेले विशेष फुगे उपलब्ध

Political parties still ignore the purchase of election campaigning material | निवडणूक प्रचार साहित्य खरेदीकडे राजकीय पक्षांचे अद्याप दुर्लक्ष

निवडणूक प्रचार साहित्य खरेदीकडे राजकीय पक्षांचे अद्याप दुर्लक्ष

Next

खलील गिरकर 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू होऊन २ दिवस उलटले असले तरी मुंबईतील विविध राजकीय पक्षांनी अद्यापही निवडणूक प्रचार साहित्याच्या खरेदीकडे लक्ष दिलेले नाही. निवडणूक प्रचारात झेंडे, टोप्या, बिल्ले यांसहित अनेक वस्तूंचा मोठा प्रभाव पडत असतो. या वेळी प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे असलेले प्लॅस्टिकचे फुगे व रात्रीच्या अंधारात झगमगणारे बिल्ले हे नवीन साहित्य बाजारात आले आहे. मात्र, अद्याप राजकीय पक्ष व उमेदवारांकडून पुरेशा प्रमाणात या वस्तूंची खरेदी सुरू झालेली नसल्याने विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे.

शिवसेना व भाजपची युती होण्यास विलंब झाल्याने टी शर्ट विक्री खालावली असल्याचे मत योगेश पवार यांनी व्यक्त केले. युती झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नावांचा व चिन्हांचा उल्लेख टी शर्टवर असणे गरजेचे असल्याने या वेळी टी शर्ट विक्री जास्त होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. मोबाइल, ओळखपत्र गळ्यात अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयडी कार्ड नेक स्ट्रॅप मध्येदेखील पक्षाच्या नावांचा व चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या विक्रीमध्ये शिवसेनेच्या प्रचार सामग्रीची सर्वांत जास्त विक्री झाली आहे.

झगमगणाऱ्या बिल्ल्यांची किंमत १५ रुपये
पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे, मफलर, साडी, टी-शर्ट, बटन, बिल्ले, टोपी, गांधी टोपी, वुलन मफलर, फेटे, कुर्ता-पायजमा आदी वस्तू विक्रीसाठी लालबाग परिसरातील दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. झगमगणाºया बिल्ल्यांची किंमत १५ रुपयांपासून आहे, तर साधा बिल्ला ३ रुपयांना उपलब्ध आहे. प्लॅस्टिकच्या फुग्याची किंमत १० रुपयांपासून १७ रुपयांपर्यंत आहे. झेंडे अर्धा मीटर ते अडीच मीटर आकारात उपलब्ध आहेत.



मोबाइल हातातून निसटू नये यासाठी वापरण्यात येणाºया पॉपसॉकेटमध्येदेखील राजकीय पक्षांच्या नावांचा, चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. अवघ्या तीस रुपयांमध्ये उपलब्ध असलेली शिवसेना, भाजप व काँग्रेस या तीन पक्षांची नावे असलेली पॉपसॉकेट तयार करण्यात आली असून त्यांना राजकीय कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा अस्लम मलकानी यांनी केला.
शिवसेनेच्या पॉपसॉकेटला मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांची चिन्हे व नावे वापरून तयार केलेले मोबाइल कव्हर लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती मलकानी यांनी दिली.

सध्या गुढीपाडवा व आंबेडकर जयंती उत्सव तोंडावर असल्याने या दुकानांमध्ये राजकीय खरेदीऐवजी या उत्सवांसाठी करण्यात येणाºया खरेदीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त विक्री विधानसभा व महापालिका निवडणुकीत होते, असे मत या व्यवसायात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या योगेश पारेख यांनी व्यक्त केले. फेटा बांधण्यासाठी मोठी मागणी असून तयार फेटा विक्रीसाठी उपलब्ध आहे. फेट्याचे कापड घेऊन फेटा बांधणारी व्यक्ती पाठविण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत या ठिकाणांहून ही सामग्री मुंबईत विक्रीसाठी येते.
 

Web Title: Political parties still ignore the purchase of election campaigning material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.