दीपक मोहिते, वसईपालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसात संपणार आहे. विविध राजकीय पक्षाचे उमेदवार उद्या आपले अर्ज सादर करण्यासाठी समर्थकासह निवडणूक कार्यालयात भाऊगर्दी करतील. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. नवा जिल्हा, नवी स्वप्ने उराशी बाळगून ग्रामीण भागातील मतदार येथे २८ जानेवारीला होणाऱ्या मतदानांत सहभागी होतील. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात विकासासंदर्भातील मागासलेपणा लक्षात घेऊन राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला. अनेक वर्षे चर्चेत असलेला हा प्रश्न मार्गी लावण्याचे शहाणपण लोकसभा निवडणुकीतील परावभानंतर सत्ताधारी पक्षांना आले. पण त्याचा राजकीय फायदा मात्र त्यांना होऊ शकला नाही. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे पानिपत झाले आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विकासाच्या मुद्यावर या निवडणुका लढवल्या जातील. अनेक समस्यांनी जर्जर झालेल्या या ग्रामीण भागाला आता तरी न्याय मिळावा अशीच मतदारांची अपेक्षा आहे.नवा जिल्हा निर्माण करताना पूर्वीचा ठाणे जिल्हा बरखास्त झाला. नवी चूल, नवा संसार या उक्तीनुसार जिल्ह्याची यंत्रणा कार्यान्वित झाली. परंतु गेल्या सहा महिन्यात प्रशासकीय गाडी रूळावर येऊ शकली नाही. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी गेल्या सहा महिन्यात अनेक घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात कृती शून्य. आजी अनेक विभागांची कामे ठाण्याहूनच होत आहेत. त्यामुळे जिल्हावासीय हैराण आहेत. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचे वेतनही वेळेवर मिळू शकत नाही. बिनशेतीची कामे होत नसल्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व प्रश्नी पालकमंत्र्यांनी लक्ष घालून जिल्हावासीयांना दिलासा मिळवून धावा अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. वाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येने जिल्हा हादरला. जाहीर झालेल्या कुपोषणाच्या आकडेवारीमुळे जिल्हा प्रशासनासमोर किती मोठी आव्हाने आहेत. यांचा अंदाज आला. परंतु या सर्व प्रश्नी प्रशासन संवेदनशील आहे असे कुठेही जाणवत नाही. केवळ मुलाखती देऊन जिल्ह्याचे प्रश्न सुटणार नाहीत. तर प्रत्यक्षात जमिनीस्तरावर यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.पाणी, शिक्षण, कुपोषण, आरोग्य इ. क्षेत्रातील समस्यांचा सर्व प्रथम विचार व्हायला हवा. जिल्ह्यात पाण्याची प्रचंड उपलब्धता आहे. योग्य नियोजन व वापराअभावी हे पाणी समुद्रात वाहून जाते. छोटी धरणे बांधून हे पाणी साठवणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिस वाएत आहे. जिल्ह्यात रेल्वेचे जाहे असल्यामुळे भविष्यात नागरीकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच क्षेत्रात विकास कामे होणे गरजेचे आहे.
विकासासाठी राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीची गरज
By admin | Published: January 11, 2015 11:30 PM