पालिकेतील राजकीय पक्ष कार्यालय खुली; नागरिकांना समस्या मांडता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:50 AM2022-03-22T09:50:32+5:302022-03-22T09:51:35+5:30
मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहाचा कालावधीत संपल्याने आठ मार्चपासून ‘प्रशासकराज’ सुरू आहे. विद्यालयातील इमारतीत महापौरांसह विविध समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कार्यालय सील करण्यात आली.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम अद्याप अनिश्चित असल्याने मुख्यालयातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये खुले ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी माजी नगरसेवकांना नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाशी संपर्क साधता यावा, यासाठी मुभा देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहाचा कालावधीत संपल्याने आठ मार्चपासून ‘प्रशासकराज’ सुरू आहे. विद्यालयातील इमारतीत महापौरांसह विविध समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कार्यालय सील करण्यात आली. त्याचवेळी राजकीय पक्षांची कार्यालय बंद ठेवण्यात आली होती. पालिकेच्या निवडणुका महिन्याभरात जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने निवडणुकीच्या तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच राज्य सरकारने गेल्या आठवड्यात वटहुकूम काढून सध्याची महापालिकेची प्रभाग रचनाही रद्द केली आहे.
आता पुन्हा नव्याने प्रभागाची पुनर्रचना केली जाईल, त्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यामुळे निवडणुका किमान चार ते पाच महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहेत. या काळात नागरिकांना समस्या मांडता याव्यात, यासाठी राजकीय पक्षाची कार्यालये पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यास प्रशासक इक्बाल सिंग यांनी मान्यता दिली आहे.