अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव

By admin | Published: October 24, 2015 03:35 AM2015-10-24T03:35:12+5:302015-10-24T03:35:12+5:30

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील काही राजकीय मंडळी आणि पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार

Political pressure on officials | अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव

अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव

Next

ठाणे : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील काही राजकीय मंडळी आणि पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. परंतु, त्यांची नावे खोडल्याने ते कोण, हे आजही गुलदस्त्यात आहे. पालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले असून, केवळ राजकीय दबावाखाली पालिकेतील इतर काही अधिकारी आणि बिल्डर काम करीत असल्याचा गौप्यस्फोट सूरज परमार यांचे बंधू उदय परमार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
तर, कॉसमॉस ग्रुपमधील कॉसमॉस होराइझन आणि ज्वेलर्स या प्रकल्पात अनियमितता असल्याचा आरोप हा बिनबुडाचा असून, या दोन्ही ग्रुपचे टायटल क्लीअर असल्याचा दावा परमार ग्रुपच्या आर्किटेक्ट सुवर्णा घोष यांनी केला. होराइझनच्या संदर्भात आम्ही आतापर्यंत केवळ एकच एफएसआय वापरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथील उर्वरित भूखंडाचा ताबा म्हाडाने घ्यावा, यासाठी त्यांच्याकडे ४ वेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही उत्तर आलेले नाही. या प्रकल्पात ८ इमारती प्रस्तावित आहेत. त्यातील तीन इमारतींचे काम पूर्ण झाले असून, त्याला पालिकेने ओसी दिली आहे. परंतु, उर्वरित इमारतींचे बुकिंग अद्यापही केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर कॉसमॉस ज्वेलर्समध्ये ७० हजार चौरस मीटरपैकी ४० हजार चौरस मीटर जागेच्या विकासाची परवानगी कॉसमॉसला मिळालेली आहे. यातील उर्वरित जागा ही मूळ जमीनमालकाच्या ताब्यात आहे. त्यावरच शाळेसाठी आरक्षित भूखंडाचे आरक्षण पडलेले आहे. त्यामुळे आम्ही कोणताही भूखंड हडपण्याचा प्रयत्नही केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पासंदर्भात नगर विकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली असून, त्यांच्या परवानगीनंतरच पालिका आयुक्तांनी पुढील परवानग्या दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वारंवार बदलणाऱ्या पॉलिसीही परमार यांच्या आत्महत्येला जबाबदार असू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
एनएची अट गेली असली तरी याच मुद्द्यावरून अद्यापही कॉसमॉसच्या १३ फाइल पडून असल्याची माहिती घोष यांनी दिली. या वेळी परमार यांचा मुलगा अभिषेक परमार, भाऊ उदय परमार, भागीदार मनीष मेहता उपस्थित होते.

इतर शहरांतही गोल्डन गँगसारख्या लोकांचा त्रास
परमार यांनी मानसिक दबावाखाली येऊनच आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आमचा विश्वास असून जे याला जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उदय परमार यांनी केली. तसेच पालिकेतील अधिकारी हे नेहमी सहकार्य करीत असतात, त्यांचा फारसा त्रास कधीच झाला नाही. परंतु, केवळ राजकीय दबावाखाली आल्याने त्यांच्याकडून काही वेळेस अशा प्रकारचे कृत्य होऊ शकते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
परमार यांचे सासरे फतेचंद रांका यांनी परमार यांच्या आत्महत्येला राजकीय आणि पालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. परंतु, शुक्रवारी परमार कुटुंबीयांनी पालिका अधिकारी सहकार्य करीत असल्याची भूमिका विशद केल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिकेतील असलेली राजकीय गोल्डन गँग ही ठाण्यातच नाही तर, इतर शहरांमध्ये कमीजास्त प्रमाणात कार्यरत असून, बिल्डरांना त्यांचा त्रास हा सहनच करावा लागत असल्याचे मत कॉसमॉस ग्रुपचे पार्टनर मनीष मेहता यांनी व्यक्त केले आहे.
नजीब मुल्ला यांनी प्रकल्पाबाबत जे आक्षेप नोंदवले, त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा टाकणार का, या प्रश्नावर मात्र कोणत्याही प्रकारचा दावा टाकणार नसल्याचे परमार कुटुंबीयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

नातेवाइकांची जबानी घेण्यास सुरुवात
सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आता ठाणे पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांच्या जबानी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जबानीची सुरुवात परमारांचा मुलगा अभिषेकपासून झाली असून, उर्वरित नातेवाइकांचीही जबानी लवकरच पूर्ण केली जाईल.
तसेच गुजरात येथे पाठवलेल्या त्यांच्या सुसाइड नोटचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच महापालिकेतून ताब्यात घेतलेली कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. तो तपासाचा भाग असल्याने त्याबाबत अधिक माहिती देता येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Political pressure on officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.