मुख्याध्यापकांच्या बैठकीत राजकीय राडा
By admin | Published: April 10, 2015 04:26 AM2015-04-10T04:26:30+5:302015-04-10T04:26:30+5:30
शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाने बोलाविलेल्या विभागातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत गुरुवारी राजकीय राडा झाला. आमदार कपिल पाटील
मुंबई : शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाने बोलाविलेल्या विभागातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत गुरुवारी राजकीय राडा झाला. आमदार कपिल पाटील मुख्याध्यापकांच्या बैठकीत पोहोचल्याचे समजताच माजी आमदार बाळासाहेब म्हात्रे यांनी गोंधळ घालत बैठक उधळून लावली.
मुंबईतील २८ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद असलेल्या सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को-आॅप. क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू आहे. याच दरम्यान मुंबई उत्तर विभागातील मुख्याध्यापकांच्या प्रश्नांबाबत भांडुप येथील एका महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुमारे पाचशे ते सहाशे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या बैठकीत आमदार कपिल पाटील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करत असल्याचे समजताच बाळासाहेब म्हात्रे यांनी पाटील यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. म्हात्रे आक्रमक होत असल्याचे पाहून अखेर ही बैठक थांबविण्यात आली. पाटील हे एका पॅनलचे प्रमुख असल्याने या बैठकीच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप करत म्हात्रे यांनी मुख्याध्यापकांची बैठक उधळून लावली. तर मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्याची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी गेल्याचे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. सोसायटीच्या होत असलेल्या निवडणुकीत आपण मतदार नसल्याने या निवडणुकीशी आपला संबंध नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. म्हात्रे यांचे वर्तन निषेधार्ह असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
सुट्यांचे नियोजन, वेतन अनुदान आदी प्रश्नांबाबत मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केल्याचे उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले. आमदार कपिल पाटील यांनी विकास आराखड्याविषयी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याची परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांनी केवळ याच विषयावर मुख्याध्यापकांशी संवाद साधला असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)