मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेले आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर राज्य सरकारकडून राणे यांच्या अटकेच्या कारवाईवरून मंगळवारी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रचंड गोंधळ घातला. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी राणे यांच्या विरोधात निदर्शने केली. राणे यांच्या जुहू येथील घरासमोर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. तर, काही ठिकाणी फटाके फोडून अटकेच्या कारवाईवर जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, या नारायण राणे यांच्या विधानानंतर मंगळवारी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणे यांचे विधान महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सांगत ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. सुरूवातीला सोशल मीडियावरून सुरू झालेले रणकंदन दुपारपर्यंत रस्त्यावर पोहचले. शिवसेना नगसेवक, पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्याविरोधात बॅनरबाजी केली. राणे यांचा भलामोठा फोटो आणि त्याच्याशेजारी कोंबडी चोर म्हणत आक्रमक बॅनरबाजी दादर, वडाळा परिसरात करण्यात आली. या बॅनरला राणे समर्थकांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि त्याच्या बाजूला घरकोंबडा अशा उपमा देत राणेसमर्थकांनी शिवसेनेला उत्तर दिले.
मुंबईतील विविध विभागातील शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीने आंदोलने केली. काही भागात राणे यांचे बॅनर फाडण्यात आले. तर, काही ठिकाणी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन झाले. मालाड पूर्व येथे जोरदार निषेध आंदोलन करत वाहतुकीचा मुख्य रस्ता रोखून धरण्यात आला. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, संघटक, विभागप्रमुखांनी आपापल्या भागात निदर्शने आणि घोषणाबाजी केली. दरम्यान, दुपारी राणे यांच्या अटकेची बातमी येताच काही भागात शिवसैनिकांकडून फटाके फोडण्यात आले. भारतमाता आणि कुलाबा येथील शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.