मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात निदर्शने करणाऱ्या युवतीने गेटवे ऑफ इंडिया येथे स्वतंत्र काश्मीरचा फलक झळकावल्याने राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे. या पोस्टरवरून भाजपने राजकीय पोळी भाजू नये, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. तर, फुटीरतावाद्यांना सरकारी वकील मिळाल्याचा प्रतिटोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.गेटवे आॅफ इंडियावर स्वतंत्र काश्मीरचा फलक झळकल्यानंतर फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यावर मंगळवारी जयंत पाटील यांनी उत्तर दिले. स्वतंत्र काश्मीर म्हणजे काश्मिरी लोकांवरील विविध बंधनांपासून सुटका असा अर्थ आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्याविरोधातला तो नारा होता. भारतीय नागरिक म्हणून त्यांना जे स्वातंत्र्य मिळायला हवे ते नाकारले जात आहे. त्याविरोधात गेटवे आॅफ इंडियावरील फलक होता. तो फलक भारतविरोधी किंवा पाकधार्जिणा नव्हता. भाजपने त्याचा वापर करून राजकीय पोळी भाजू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतेसुद्धा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता गेल्यामुळे ते असे वागत आहेत की स्वत:वरचे नियंत्रण हरवत आहे, असा टोलेवजा सवाल जयंत पाटील यांनी केला होता.जयंत पाटील यांच्या या प्रश्नावर फडणवीस यांनीसुद्धा जोरदार पलटवार केला आहे. जयंत पाटील यांनी केलेले समर्थन केविलवाणे आहे. असे व्होट बँकेचे राजकारण त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. फुटीरतावादी तत्त्वांना आवर घालण्याऐवजी त्यांची वकिली करण्याचा हा प्रयत्न आहे. फुटीरतावाद्यांना सरकारी वकीलच मिळाले आहेत. उलट आज काश्मीर भेदभावापासून मुक्त झाला आहे. सुरक्षा कारणांमुळे दशकांपासून तिथे काही बंधने आहेत. सत्तेत असो अथवा विरोधात, देशहित हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी चढविला.>... तर ती चुकीची बाबयुवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या फलकावर आपली बाजू मांडली. अख्ख्या आंदोलनात हा एकमेव प्रसंग घडला. तो भारतविरोधी असेल तर चुकीची बाब आहे. या सर्व विषयाकडे विस्तृत दृष्टिकोनातून बघायला हवे. बाकी आंदोलन हे जेएनयूतील हिंसाचाराविरोधात होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
स्वतंत्र काश्मीरवरून राजकीय टोलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 5:54 AM