- गौरीशंकर घाळेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओबीसी राजकीय आरक्षण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने राजकीय आघाडीवर असलेली शांतता मालमत्ता करमाफीच्या निर्णयाने भंग पावली आहे. मालमत्ता कराबाबतची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक करीत त्यांच्यामुळे आपला भार हलका झाल्याचे म्हटले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आदित्य यांच्याकडे शिवसेनेची धुरा असेल, असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का, अशी चर्चा आहे. त्यातच मुख्यमंत्री ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव दैनंदिन कार्यक्रमांत प्रत्यक्ष सहभागी नाहीत. निवडणुकांची रणधुमाळी काही काळ पुढे गेल्यास शिवसेना नेतृत्वाच्या ते पथ्यावर पडणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एक-दोन महिन्यांपासून मुंबईतील राजकीय घमासान थंडावल्याचे चित्र होते. संघटनात्मक बाबी सोडल्या तर इतर आघाडीवर शांतता होती. विरोधकही अंदाज बांधत, चाचपडत असल्याचे चित्र होते. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगर विकास विभागाची बैठक घेतली. यात मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय घोषित करत राजकीय टोलेबाजी केली. विशेष म्हणजे मागील पालिका निवडणुकीतील आश्वासनाबाबत आता घोषणा करतानाच शिवसेनेच्या भावी नेतृत्व आणि रणनीतीचेही संकेत दिले. दुसरीकडे आगामी पालिका निवडणुकीचा भार आदित्य ठाकरे यांच्यावर असणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सूचित केले आहे.
टीकेमुळे प्रचारच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालमत्ता कराबाबत घोषणा केल्यानंतर भाजप नेत्यांकडून रोज त्यावर टीकेची झोड उडविली जात आहे. मात्र, विरोध करण्याच्या या मोहिमेत एका अर्थाने शिवसेनेच्या घोषणेचाच अधिक प्रचार होत असल्याचे सध्याचे वातावरण बनले आहे. विरोधकांचे लक्ष इतर विषयांवरून हटवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी खुबीने आपल्या मुद्द्याभोवती चर्चा करण्यास भाग पाडले आहे.