- सचिन लुंगसे ।मुंबईतील नळांचे पाणी सर्वाधिक शुद्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी येथील पंधरा टक्के भाग असा आहे की, तेथील प्रदूषणामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात राजकीय इच्छाशक्तीच अशी की, लोकांना शुद्ध पाणी मिळू नये. कारण असे झाले किंवा असे केले की, त्या मुद्द्यांचा वापर राजकारणासाठी करता येऊ शकतो. त्यावर ‘व्होट’ बँक’ टिकून राहते. मते मागता येतात. शुद्ध पाणी मिळत नसल्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे पाणी हक्क समितीचे निमंत्रक आणि जलतज्ज्ञ सीताराम शेलार यांनी सांगितले.
प्रश्न : शुद्ध पाण्याचा दावा खरा आहे?उत्तर : नळाचे पाणी शुद्ध असल्याचा दावा खरा आहे. कारण पाणी अशुद्ध असल्याची तक्रार सोसायटीतून येत नाही. अधिकृत वस्त्यांतून येत नाहीत. ज्या वस्त्या श्रमिकांच्या, गरिबांच्या आहेत, तेथून अशुद्ध पाण्याच्या तक्रारी येतात. पंधरा टक्के नेटवर्क असे आहे की, तेथे पाणी शुद्ध येते. मात्र, तेथील प्रदूषणाच्या विषयाला प्राधान्य देण्यात आले नाही. म्हणून तेथे ही समस्या आहे.
प्रश्न : २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे स्वच्छ पाणी देण्याच्या उद्दिष्टाबाबत काय सांगाल?उत्तर : केंद्राचे उद्दिष्ट चांगले आहे. जाहिरात अशी होते की, प्रत्येक घरात शुद्ध पाणी जाईल. मात्र, हे कागदोपत्री तपासले, तेव्हा लक्षात आले की, हे ग्रामीण भागासाठी आहे. त्यामुळे हा दिखाऊपणा आहे. मुंबईची लोकसंख्या वाढते आहे. ती ४२ टक्के झाली आहे. राजकीय लाभासाठीच जाहिरात केली जाते.
प्रश्न : १०० स्मार्ट शहरांतही पाण्याची तपासणी केली जात आहे का?उत्तर : येथे प्रयोग राबविताना छोटा भाग निवडला जातो. मुंबई स्मार्ट सिटीमध्ये नाही. प्रशासन तेथे उद्यान बनविते. कारण बाजूला विकासकांनी इमारती उभ्या केल्या आहेत. या प्रकल्पांचा स्मार्ट शहरांची संबंध नसतो. तो एक छोटासा प्रकल्प असतो. स्मार्ट शहरांची अंमलबजावणीच दोन ते तीन टक्क्यांच्या आसपास असेल, तर पाणी ते कसे तपासणार?
प्रश्न : गळती, चोरी, मागणी-पुरवठ्याबाबत काय सांगाल?उत्तर : सत्ताधारी, विरोधी पक्षानेच पाण्याचे राजकारण सुरू केले. आम्ही सर्वांना पाणी देण्याचा निर्णय घेत आहोत; हा निर्णय त्यांनी घेतला, तरी पाण्याची चोरी, गळती थांबेल. जलजोडणी पारदर्शक होणार नाही, तोपर्यंत पाण्याची चोरी थांबणार नाही.पाण्याचा पुनर्वापर करावाझोपड्यांत पाण्याची चोरी होते, हा गैरसमज आहे. व्यावसायिक कंपन्यांसाठी पाणी चोरले जात आहे. याचे कारण भ्रष्टाचार हे आहे. यासाठी पाण्याचे आॅडिट केले पाहिजे. मुंबईकडे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी आहे. एवढे पाणी नसते, तर एवढ्या प्रकल्पांना आपण परवानग्याच दिल्या नसत्या. पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. पाणी कमी आहे, ही केवळ जाहिरातबाजी आहे. प्रपोगंडा आहे. त्याचा वास्तवाशी संबंध नाही. पाण्याचा पुनर्वापर केला, तर आजूबाजूच्या दोन-चार शहरांना पाणी पुरविता येईल, असे सीताराम शेलार यांनी सांगितले.खासगीकरणाचा डावमुंबई पालिकेच्या जलविभागाच्या खासगीकरणाचा राजकीय पक्षांचा डाव आहे. म्हणून त्यांना हे मान्यच करायचे नाही की, पालिका चांगले काम करते. पालिकेचे पाणी शुद्ध आहे, हे राजकीय पक्ष मान्य करण्यास तयार नाहीत. यामागचे कारण म्हणजे त्यांना मुंबई पालिकेचे जलखाते हे खासगी व्हावे, असे वाटते. आम्ही पाण्याच्या अधिकारासाठी लढत आहोत. परिणामी, आम्हाला असे वाटते की, यंत्रणेमधील चांगल्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्याला पाठबळ दिले पाहिजे, असे शेलार यांनी सांगितले.