Join us

दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 7:08 AM

काही दिवसांपासून रुसलेल्या पावसाने गुरुवारी दहीहंडीचा मुहूर्त साधत जोरदार पुनरागमन केल्याने गोविंदांचा उत्साह दुणावला होता.

- जयंत हाेवाळमुंबई : नजीकच्या काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्यापाठोपाठ येणारी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे निमित्त साधत अनेक राजकीय पक्षांनी अधिकाधिक दहीहंडी कार्यक्रमांना उपस्थिती लावत भर पावसात संभाव्य मतांची पेरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे, भाजप हे चार पक्ष संपूर्ण ताकदीने दहीहंडी उत्सवात उतरल्याचे दिसत होते. या तीन पक्षांच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ‘घागर’ मात्र फार भरल्याची दिसली नाही.

काही दिवसांपासून रुसलेल्या पावसाने गुरुवारी दहीहंडीचा मुहूर्त साधत जोरदार पुनरागमन केल्याने गोविंदांचा उत्साह दुणावला होता. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उत्साहालाही उधाण आले होते. अधिकाधिक गोविंदा पथकांना भेटण्याची अहमहमिका नेत्यांमध्ये लागल्याचे चित्र होते. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणी उपस्थिती लावली. वरळीच्या जांबोरी मैदानात फडणवीस यांनी मुंबई  परिवर्तनाची परिवर्तनाची हंडी फोडली. त्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत परिवर्तन होणार, असा इशारा  भाजपने दिला. 

आदित्य ठाकरे यांनी वरळीपासून सुरुवात करत गिरगाव, भायखळा, परळ, शिवडी, दादर, वांद्रे , खेरवाडी, विलेपार्ले यासह अनेक ठिकाणच्या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.  आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. ठाकरे यांच्या  शिवसेनेच्या वतीने ‘निष्ठावंतांची हंडी’ उभारण्यात आली होती. मुंबई काँग्रेसच्या वतीने मुलुंड, भांडूप, बोरीवली घाटकोपर या ठिकाणी हंडी उभारण्यात आली होती. त्या ठिकाणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी भेट दिली. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची घागर उताणीदहीहंडी उत्सवात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे अस्तित्व तुलनेने कमी दिसले. पुरुषोत्तम दळवी यांच्या मुलुंड येथील उत्सवात मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. तर काँग्रेसचे मोठे नेते मात्र फार कुठे दिसले नाहीत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक पदाकडे नजर लावून बसलेल्या विविध पक्षीय संभाव्य उमेदवारांनी आपापल्या विभागात हंडीचे आयोजन करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवत होते.  

मुख्यमंत्र्यांची ३१ ठिकाणी उपस्थितीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यापासून सुरुवात केली. दुपारी तीनच्या सुमारास तेथील कार्यक्रम आटोपून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले. ठाण्यातील कोपरी, उथळसर नाका, खेवरा सर्कल, रघुनाथ नगर, बाळकुम, वागळे इस्टेट, लुईस वाडी, हिरानंदानी मेडोज, कल्याण, भिवंडी, मुलुंड, नवी मुंबई, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, अशा जवळपास ३१ ठिकाणच्या मंडळांकडून त्यांना निमंत्रण होते. यापैकी बहुसंख्य ठिकाणी त्यांची उपस्थिती होती.

आठवले यांच्या कवितांचा पाऊस केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे आमदार रामदास कदम यांनी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहीहंडीत हजेरी लावली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाला त्यांनी त्यांच्या कवितांच्या पाऊस सरींची साथ दिली. त्यांच्या कवितांनी चांगलीच दाद दिली. कितीही आला पाऊस, कितीही आला पाऊस , तरी मुंबईकरांना आहे दहीहंडीची हौस.कदम यांच्या नावात आहे राम, का होणार नाही तुमचे काम? ज्यांनी विरोधकांना फोडला आहे घाम, असे आहेत माझे मित्र कदम राम... देशामध्ये बांधली आहे नरेंद्र मोदी यांनी हंडी मग कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी ?

टॅग्स :दहीहंडीमुंबईराजकारण