एजाज खानच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये राजकारणीही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:23+5:302021-04-05T04:06:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ड्रग्ज माफियाशी कनेक्शनप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अटकेतील अभिनेता एजाज खानने चौकशीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्ज माफियाशी कनेक्शनप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अटकेतील अभिनेता एजाज खानने चौकशीत काही राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचे समजते. त्याच्या ड्रग्ज व्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ‘एनसीबी’ त्याबाबत अधिक चौकशी करत आहे.
ड्रग्ज माफिया फारुख बटाटा व त्याचा पुत्र आरिफबरोबर असलेल्या ड्रग्ज तस्करीसंबंधी ‘एनसीबी’ने मंगळवारी रात्री उशिरा एजाज खानला अटक केली. त्याच्या माध्यमातून अमली पदार्थ चित्रपटसृष्टीतील सिलेब्रेटींना पुरवित असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी टीव्ही कलाकार गौरव दीक्षित याच्या अंधेरीतील घरावर छापा टाकुन ड्रग्ज जप्त केले. मात्र, तो तेथून पलायन करण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध सुरू असून अटकेतील एजाज खानने काही राजकरणाशी संबंधित काही मंडळींची नावे घेतल्याचे समजते. त्यामध्ये काही राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असून त्यांच्या तो संपर्कात होता. विविध पार्ट्यांमध्ये त्यांच्या भेटीगाठी झाल्या असल्याची माहिती दिली आहे. ‘एनसीबी’ त्याबाबत अधिक माहिती मिळवित असून सबळ पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.