झोपड्यांवरील कारवाईची राजकारण्यांना धास्ती

By admin | Published: October 7, 2016 06:05 AM2016-10-07T06:05:19+5:302016-10-07T06:05:19+5:30

ऐन निवडणुकीच्या मोसमात महापालिका आयुक्तांनी १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय पक्ष बिथरले

Politicians protest against hutments | झोपड्यांवरील कारवाईची राजकारण्यांना धास्ती

झोपड्यांवरील कारवाईची राजकारण्यांना धास्ती

Next

मुंबई : ऐन निवडणुकीच्या मोसमात महापालिका आयुक्तांनी १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय पक्ष बिथरले आहेत़ आधीच फेररचना आणि आरक्षणात मार खाल्ल्यानंतर आता उरल्यासुरल्या व्होट बँकेवर पाणी सोडण्यास नगरसेवक तयार नाहीत़ म्हणूनच या कारवाईला विरोध होऊ लागला आहे़ मात्र, बेकायदा बांधकामांना अभय मागून अडचणीत येण्याची शक्यता असल्याने, आधी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मग झोपड्यांना हात लावा, अशी भूमिका राजकीय पक्ष घेऊ लागले आहेत़
मुंबईत १४ फुटांपर्यंतच्या झोपड्यांना शासनाची मान्यता आहे़ मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये झोपड्यांवर टॉवर्स उभे राहू लागले आहेत़ त्यामुळे अशा झोपड्यांचे सर्वेक्षण करून कारवाई सुरू करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी दिले़ पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका असताना, १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईने नगरसेवक धास्तावले आहेत. फेररचनेने अनेकांची व्होट बँक विभागली गेली आहे़ त्यात मोठी व्होट बॅँक झोपडपट्ट्यांमध्ये असते़ त्यामुळे ही कारवाई रद्द होण्यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत़ मात्र, बेकायदा बांधकामांचे समर्थन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते़, म्हणून नगरसेवक गप्प आहेत़ यात राष्ट्रवादीने पुढाकार घेत, आयुक्तांची भेट घेतली़ मात्र, या झोपड्यांना संरक्षण देण्याची थेट मागणी करण्याऐवजी तत्कालीन अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली़ (प्रतिनिधी)
मुंब्रा, दिवाप्रमाणे हवे अभय
मुंब्रा, दिवा येथील झोपड्यांना संरक्षण मिळत असताना, मुंबईला वेगळा न्याय का? त्यामुळे मुंबईतील झोपड्यांचाही विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे़
राष्ट्रवादी मोजणार खड्डे
खड्डे प्रकरण यंदाच्या निवडणुकीत गाजणार आहे़, हे ओळखून प्रत्येक विरोधी पक्ष रस्त्यांवर उतरू लागला आहे़ पाऊस थांबल्यामुळे तत्काळ खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले़ मात्र, १० आॅक्टोबरपर्यंत खड्डे न बुजविल्यास राष्ट्रवादी मुंबईतील खड्ड्यांची गणना करणार आहे़

Web Title: Politicians protest against hutments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.