मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा विभाग दिला जाणार का? याविषयी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यानिमित्ताने नागपुरातील काँग्रेस अंतर्गत खदखदही जाणवत आहे.नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच आपल्याला मंत्रिपददेखील मिळावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. आता काँग्रेसमध्ये नव्याने कोणाला मंत्रिपद द्यायचे तर कुण्या एका मंत्र्यास राजीनामा द्यावा लागणार आहे. नेमका हाच मुद्दा काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुशीला कारणीभूत ठरत आहे.राऊत यांच्या जागी ऊर्जा मंत्रिपद हे पटोले यांना द्यावे यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार पटोेले यांना मंत्रिपद देऊ नये, असे त्यांच्या विरोधात सांगितले जात आहे. राऊत हे काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मंत्रीदेखील आहेत, याकडे त्यांच्या विरोधात लॉबिंग करणारे लोक लक्ष वेधत आहेत. पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि राऊत यांच्यातील मतभेदांचीही चर्चा होत आहे. बंगल्यापासून विमान प्रवासापर्यंत राऊत यांच्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी पद्धतशीरपणे बातम्या पसरविल्या असल्याचे म्हटले जाते.
त्यांचा सन्मान करतोपटोले हे आमचे प्रांताध्यक्ष आहेत, मी त्यांचा सन्मान करतो. मंत्रिपदाबाबतची कोणतीही बाब माझ्यापर्यंत आलेली नाही.- नितीन राऊत, ऊर्जा मंत्री