सिडकोच्या इमारतींचे राजकारण
By admin | Published: April 5, 2015 12:05 AM2015-04-05T00:05:34+5:302015-04-05T00:05:34+5:30
सिडकोनिर्मित्त जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावरून वाशी विभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रभागी राहिला आहे.
कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबई
सिडकोनिर्मित्त जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावरून वाशी विभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रभागी राहिला आहे. भाजपा सरकारने महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर या प्रस्तावाला मंजुरी देऊन मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रस्तावात अनेक त्रुटी राहिल्याने तो प्रश्न भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबईची आद्य वसाहत म्हणून वाशी विभागाची ओळख आहे. सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असणाऱ्या विभागात मागच्या प्रभागांची संख्या १४ इतकी होती. यावेळी ती दोनने कमी करून ती १२ झाली. विभागातील बहुतांशी प्रभागात सिडकोनिर्मित्त इमारतीतून राहणाऱ्या मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली प्रत्येक निवडणूक पुनर्बांधणीच्या आश्वासनावर लढली गेली. याचा परिणाम म्हणून विभागातील मतदारांनी प्रत्येक वेळी सत्ताधारी राष्ट्रवादीला झुकते माप दिले. मात्र यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून येथील मतदारांचा हा ट्रेंड काहीसा बदलल्याचे दिसले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या अनेक प्रभागातून पक्षाचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे दिसून आले आहे. महापालिका निवडणुकीतही हाच ट्रेंड राहिल्यास आपले काही खरे नाही, या धास्तीने राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रभाग रचना व महिला आरक्षणामुळे विभागातील बहुतांशी आजी-माजी नगरसेवकांवर घरी बसण्याची वेळी आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपली पत्नी किंवा सुनेला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीला तिकीट नाकारल्याने वाशी सेक्टर १७ येथील नगरसेवक संपत शेवाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाची कास धरली. तर याच प्रभागातून निष्ठेचा निकष लावून राष्ट्रवादीने माजी उपमहापौर भरत नखाते यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेच्या विठ्ठल मोरे यांनीही आपल्या प्रभागातून सुनेला तर सेक्टर- ९ मधून स्वत: लढण्याची तयारी चालविली आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिक नाराज झालेले असतानाच भाजपानेही याच प्रभागावर हक्क सांगितल्याने तो जागा वाटपात कळीचा मुद्दा बनला आहे. तर काँगे्रसच्या नगरसेविका सिंधू नाईक यांनी ऐन निवडणुकीच्या आधी काँगे्रसला सोडचिठ्ठी देऊन हातात शिवबंधन बांधून दोन जागा मागितल्या आहेत. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली आहे.
वाशी विभागात कॉस्मोपॉलिटीन लोकवस्ती आहे. सेक्टर १७, सेक्टर १४ आणि २९ या परिसरात गुजराती व मारवडी मतदारांचा प्रभाव अधिक आहे. अडीच एफएसआयचा निकाली निघालेला प्रश्न आणि गुजराती, मारवाडी मतदारांचा पाठिंबा या बळावर या विभागात राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना धक्का देण्याची व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शिवसेना आणि काँग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
असे असले तरी यावेळीसुध्दा अडीच एफएसआयचा मुद्याच कळीचा ठरणार असल्याने वाशी विभागात राष्ट्रवादी व शिवसेना- भाजपा आमने सामने येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्रभाग आरक्षणलोकसंख्यामतदार अ.जा. अ.ज.
५३ जुहूगांव १महिला (नागरिकांचा मागासवर्ग)१0६६२६१३३९७६२00
५४ वाशी नोड १खुला १११२९८२७0१९६१५
५६ कोपरी गांवमहिला१0३३८५७४८६२३२६८
५७, एपीएमसी मार्केटखुला९३६२५0७१३९९९१
५८ वाशी नोड २खुला११00४११४३६३४५९९
५९, जुहूगांव २खुला (नागरिकांचा मागासवर्ग)९९७८४८६२८८३११४
६0,वाशी नोड ३खुला ११५७१११५९0५४७४६
६१, वाशी नोड ४मागासवर्ग १0८३५११६८0८४५१२५
६२, वाशी नोड ५महिला ११११९११६४७५२३३0
६३, वाशी नोड ६महिला ११0७५११७४0२२५८७
६४ वाशी नोड ७महिला ११३६९१२७0२३२२७३
६५ वाशी गावमहिला १0५१९८६५५८१४८९
७७, सानपाडा नोड ३महिला ९७९३४५४५६३५११३
विभागातील विद्यमान नगरसेवक
वाशी विभागात मागच्या वेळी महापालिकेवर एकूण १४ नगरसेवक निवडून गेले होते. विलास भोईर, सुनंदा शशिकांत राऊत, प्रभाकर गोमा भोईर, प्रणाली अविनाश लाड, किशोर पाटकर, रोहिणी रमेश शिंदे, शिल्पा प्रकाश मोरे, सिंधू अरविंद नाईक, विक्रम धनाजी शिंदे, भरत सहादू नखाते, वैभव गायकवाड, विठ्ठल मोरे,दशरथ भगत व संपत शेवाळे आदींचा समावेश आहे. यात राष्ट्रवादीचे दहा, काँग्रेस तीन व शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश होता.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मिळावा यासाठी माजी मंत्री गणेश नाईक यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभा निवडणुकीअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून त्याला मंजुरीही मिळविली होते.
मात्र त्याच काळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने यासंबंधीचा अध्यादेश निघू शकला नाही. त्याचा अप्रत्यक्ष फटका नाईकांना निवडणुकीत बसला. परंतु राज्यात सत्तांतरानंतर भाजपाचे सरकार स्थापन झाले. आमदार मंदा म्हात्रे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्याला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळविली.
असे असले तरी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आयत्या पिठावर रेघोट्या मारून भाजपाने मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यातच अडीच एफएसआय केवळ सिडकोने बांधलेल्या परंतु सध्या धोकादायक इमारतींसाठीच असल्याने इतर रहिवाशांच्या मोठ्या घराचे स्वप्न भंगले आहे. यामुळे या मुद्याचे प्रचारात भांडवल करायचे की नाही,यावरून त्या पक्षांत मतभिन्नता आहे.