डम्पिंगचे राजकारण पेटले
By admin | Published: March 27, 2016 02:43 AM2016-03-27T02:43:41+5:302016-03-27T02:43:41+5:30
देवनारमधील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझली असली तरी त्याचा राजकीय ‘धूर’ आता दीर्घकाळ निघत राहणार आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा
मुंबई : देवनारमधील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझली असली तरी त्याचा राजकीय ‘धूर’ आता दीर्घकाळ निघत राहणार आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबतचे राजकारण आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या भागातील समाजवादी पार्टीचे स्थानिक आमदार अबू आझमी यांच्या आंदोलनानंतर पाठोपाठ शनिवारी कॉँग्रेसने परिसरात मोर्चा काढून निदर्शने केली आहेत. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झालेली
होती. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीही आंदोलन करण्याच्या तयारीत
आहे.
दोन दिवसांपूर्वी या डम्पिंगच्या धुरामुळे याच परिसरात राहणारे सर्फराज खान यांचा सहा महिन्यांचा मुलगा हसनैन याचे श्वसनाच्या आजारामुळे निधन झाले. त्यामुळे पालिकेने तत्काळ हे डम्पिंग ग्राउंड बंद करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर सुमारे तीस मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात माजी खासदार एकनाथराव गायकवाड, मनपा विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा,माजी मंत्री आमदार वषार्ताई गायकवाड,चरणसिंग सप्रा,वेल्लूस्वामी नायडू ,कचरू यादव,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर तसेच देवनार,चेंबुर,मानखुर्द या भागातील रहिवाशी सहभागी होते. या वेळी निरुपम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
देवनारमधील डम्पिंग ग्राउंडला तीन महिन्यांच्या कालावधीत दोनदा लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणचे ‘डम्पिंग’ हलविण्यासाठी नागरिकांकडून तीव्र आंदोलन होत असताना राजकीय पक्षांनीही त्यामध्ये उडी घेतली आहे.
गेल्या आठवड्यात अबू आझमी यांनी देवनारला भेट देऊन कार्यकर्त्यांसमवेत निदर्शने केली होती. शनिवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गोवंडीमध्ये रास्ता रोको केला. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी निदर्शने केली.
देवनार डम्पिंग ग्राउंडला गेल्या तीन महिन्यांत ही दुसऱ्यांदा आग लागल्याने या परिसरातील रहिवाशांना खोकला, डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचे त्रास होत आहेत. गोवंडीसह चेंबूर आणि घाटकोपरपर्यंत धुराचे लोट पसरत असल्याने याचा मोठा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे.