सिनेट निवडणुकांवरुन राजकारण तापले; ठाकरे गट-मनसेची स्थगितीवरून सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:00 AM2023-08-19T06:00:09+5:302023-08-19T06:01:06+5:30
निवडणूक का स्थगित केली, याचे उत्तर देण्याचे आव्हानही दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवीधर गटाच्या सिनेट निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित केल्याने अपेक्षेप्रमाणे त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विद्यार्थी संघटनांनी स्थगितीवर टीका केली आहे. निवडणूक का स्थगित केली, याचे उत्तर देण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.
७५५ दुबार मतदार हेतुपुरस्सर यादीत
७ ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पदवीधर मतदारांच्या सुधारित यादीत प्रथमदर्शनी ७५५ हून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले होते. यादीत हजारो नावे विशिष्ट हेतूने समाविष्ट करण्यात आली आहेत. नावे सारखी असली तरी त्यांची जन्मतारीख आणि पत्ता यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला असल्याचा संशय आहे. त्यावर सदर विषयाची चौकशी करेपर्यंत सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू नये, अशी विनंती केली होती. - आशिष शेलार, आमदार
मतदार नाकारतील या भीतीने स्थगिती
एका रात्रीत असे काय घडले की निवडणूक स्थगित करण्यात आली? हा निर्णय बैठकीनुसार झाला तर बैठकीचे मिनिट्स मिळावेत. सव्वालाख मतदारांनी नोंदणी केली आहे. तरी देखील निवडणूक रद्द करण्यात आली. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशात कोणतीही निवडणूक रद्द होत नाही. मग मुंबईत असे काय झाले? पदवीधर मतदार नाकारतील, याच भीतीने निवडणूक रद्द करण्यात आल्या आहेत. शासन आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी. - आ. आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख
विद्यापीठ प्रशासन कोणाला घाबरतेय
निवडणुका का रद्द करण्यात आल्या, याचे कारणही विद्यापीठाच्या कुलसचिवांना नमूद करण्याची गरज वाटली नाही का? पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या १२ तास आधी निवडणूक स्थगित केल्याने उमेदवार व मतदारांमध्ये शंका असून विद्यापीठ प्रशासन नेमके कुणाला घाबरते? राज्यातील पालिका निवडणुका सातत्याने पुढे ढकलणारे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील, तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे स्पष्ट आहे. कुलपती म्हणून आपण या प्रकरणात लक्ष घालावे. - अमित ठाकरे, अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना.
राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले
सरकारला त्यांचा पराभव आणि जवळपास १२ लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांचा कौल आपल्या विरुद्ध जाणार आणि जनतेमध्ये शासनाच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ होणार या भीतीने शासनाने ही निवडणूक स्थगित केली आहे. अखेर राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले. - प्रदीप सावंत, युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य.
शासनाचा चुकीचा पायंडा
सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांची युवा आघाडी व विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव निश्चित होणार हे लक्षात आल्यामुळे हा रडीचा डाव खेळला आहे. एक चुकीचा पायंडा हे शासन पाडत असून याचा आम्ही धिक्कार करतो. – रोहित ढाले, राज्य अध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना.
विद्यापीठावर दबाव आहे का?
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून अचानक त्याला स्थगिती देण्यात येते, हे आश्चर्यकारक आहे. सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा जाहीर निषेध. मुंबई विद्यापीठावर नेमका कोणाचा दबाव आहे? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येत्या सात दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अन्यथा कुलगुरूंना घेराव घालू.- ॲड. अमोल मातेले, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.