सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:52 AM2020-08-20T03:52:00+5:302020-08-20T03:52:54+5:30

शिवसेना-भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपने या निर्णयाचे स्वागत केले, तर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Politics heats up over CBI probe; The dust of the accused transplants | सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा

सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले. शिवसेना-भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपने या निर्णयाचे स्वागत केले, तर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा हा निर्णय आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी त्याचे कुटुंबीय व चाहत्यांना आता न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते नारायण राणे म्हणाले, जनतेच्या मनातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई पोलिसांनी आत्मपरिक्षण करावे. माजी मंत्री आशिष शेलार यांनी, राज्य सरकारने आतापर्यंत या प्रकरणात लपवाछपवी केली होती. त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? आता तरी सीबीआयला सहकार्य करा, असा टोला हाणला. पोलिसांनी ठरविले तर मंदिरासमोरची चप्पलही चोरीला जाऊ शकत नाही, पण सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही, त्यांना कुणी ठरवू दिले नाही असा सवाल केला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अधिकारांचा भंग - परब
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या घटनात्मक अधिकाराचा भंग
झाला आहे, असे परिवहनमंत्री
आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना काय म्हणते. घटनातज्ज्ञ काय म्हणतात ते जास्त महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
‘अब बेबी पेंग्विन तो गियो... इट्स शो टाइम’ अशा शब्दांत भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादीचे आमदार पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत न्यायालयाच्या निकालावर आपले मत व्यक्त केले.
> हे तर षड्यंत्र : संजय राऊत
शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे एक षड्यंत्र आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभर आहे पण आपल्याच राज्याचे काही नेते पोलिसांना बदनाम करीत आहेत.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुशांत प्रकरणी खालच्या पातळीवर आरोप होत आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसताना पुराव्यांशिवाय त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, हे दुर्दैवी आहे.
>सत्याचा विजय...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचा विजय आहे. असत्यावर आज सत्याचा विजय झाला. ही एका कुटुंबीयांची किंवा वैयक्तिक लढाई नसून १३० कोटी जनतेची लढाई आहे. या निकालामुळे लोकांमध्ये न्यायव्यवस्थेबाबतचा आदर आणखी वाढला आहे. तसेच एका आयपीएस अधिकाऱ्याला अपराध्यासारखे ठेवले हे संपूर्ण देशाने पाहिले. तपासात महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केले नाही. तसेच रियाची बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत भाष्य करण्याची लायकी नाही.
- गुप्तेश्वर पांडे, पोलीस महासंचालक, बिहार पोलीस


पार्थ पवार यांचे
‘सत्यमेव जयते’
सीबीआय चौकशीचा न्यायालयाचा निकाल येताच पहिली प्रतिक्रिया दिली ती पार्थ अजित पवार यांनी. टिष्ट्वटमध्ये त्यांनी, ‘सत्यमेव जयते’ एवढाच उल्लेख केला. पार्थ यांनी अलिकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली तेव्हा ते अपरिपक्व असल्याची टीका त्यांचे आजोबा शरद पवार यांनी केली होती. त्यानंतरच्या घडामोडीत पार्थ यांची कुटुंबात समजूत काढण्यात आल्याचे चित्र असताना पार्थ यांनी टिवटिवाट कायम ठेवला आहे.
>गृहमंत्री देशमुख यांच्याशी
महाधिवक्त्यांची चर्चा
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. सीबीआय चौकशीच्या निकालानंतर राज्य सरकारची पुढची भूमिका काय असावी, या बाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
>निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील भूमिका...
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, ‘न्यायालयाकड़ून निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचे नमूद केले. मात्र त्यानंतर अद्याप त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
>कुठे सूचक इशारे तर कुठे थेट हल्लाबोल
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लागलीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला. तर, विरोधकांकडून केवळ बदनामीचे राजकारण सुरू असून सुशांतसिंहबाबत विरोधकांना अजिबात सहानुभूती नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. एकूणच राजकीय नेत्यांकडून या प्रकरणी कुठे सूचक इशारे तर कुठे थेट हल्लाबोल सुरू आहे. दिवसभर समाज माध्यमांतही याच प्रकरणावर चर्चेचे फड रंगले होते.
>तपासावर प्रश्नचिन्ह लावण्याचे षड्यंत्र
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारे हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे एक षड्यंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. जर मुंबई पोलिसांना आपल्याच राज्यातील राजकारणी बदनाम करीत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करीत आहेत.
- संजय राऊत,
खासदार, शिवसेना नेते
>ठाकरे सरकारची
दादागिरी संपेल
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. पण, न्यायालयाच्या निकालामुळे सुशांतसिंहच्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल.
- किरीट सोमय्या, भाजप नेते
>गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद. सुशांत प्रकरणी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्र्यांनी आता कडक ताशेºयानंतर तरी त्वरित राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करून संबंधित पोलिसांची सीबीआय चौकशी करावी.
- अतुल भातखळकर, भाजप प्रवक्ते
>सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : घटनाक्रम
८ जून : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनची आत्महत्या.
८ जून : रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर सोडले.
१४ जून : वांद्रे येथील घरात अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या, वांद्रे पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करीत तपास सुरू.
१६ जून : पोलिसांनी सुशांतचे वडील, तीन बहिणी आणि मेहुण्याचा जबाब नोंदविला. त्यांनी कुणाबद्दल संशय व्यक्त केला नाही.
२५ जुलै : बिहार पोलिसांकडून रिया चक्रवर्तीसह तिचे नातेवाईक आणि एक्स मॅनेजर श्रुती मोदी, हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाविरुद्ध गुन्हा नोंद.
२८ जुलै : बिहार पोलिसांचे पथक चौकशीसाठी मुंबईत दाखल.
२९ जुलै : रिया चक्रवर्तीने गुन्हा दाखल होताच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या गुन्ह्याचा तपास मुंबईतच व्हावा अशी मागणी केली.
३० जुलै : सुशांतच्या कुटुंबीयांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल, रियाच्या अर्जावर विचार करण्यापूर्वी बाजू ऐकून घेण्याची विनंती.
३१ जुलै : बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या खात्यातून काढलेल्या १५ कोटींच्या तपासासाठी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करीत तपासाला सुरुवात केली.
२ आॅगस्ट : पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत, येताच त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले.
३ आॅगस्ट : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने असून, बिहार पोलिसांनी गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवा होता, असे नमूद करीत तपासाबाबत माहिती दिली.
३ आॅगस्ट : सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पहिल्यांदा व्हिडीओद्वारे शेअर केलेल्या माहितीत, सुशांतसंबंधित २५ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने पाटणा पोलिसांकडे धाव घेतल्याचे सांगितले. मात्र अशी कुठलीही लेखी तक्रार दिली नसल्याची माहिती, मुंबई पोलिसांनी दिली आहे.
६ आॅगस्ट : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच, सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.
७ आॅगस्ट : रिया चक्रवर्तीकडे ईडीकड़ून चौकशी सुरू. नवी मुंबईतील कंपनीचीही झाडाझडती, मॅनेजर श्रुती मोदीही चौकशीच्या घेºयात.
८ आॅगस्ट : महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तपासाची माहिती देत, सीबीआय चौकशीला विरोध केला.
८ आॅगस्ट : रियाचा भाऊ शोविककडे ईडीची १८ तास चौकशी.
१० आॅगस्ट : ईडीकडून रियाकडे पुन्हा चौकशी.
१४ आॅगस्ट : ईडीकडून मुंबई पोलिसांना पत्र, सुशांतसंबंधित डिजिटल पुरावे देण्याची मागणी.
१९ आॅगस्ट : सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआय तपासाला ग्रीन सिग्नल.


सत्य हे सत्यच राहणार
तपास कोणीही केला तरी सत्य हे सत्यच राहणार आहे. कोणत्याही यंत्रणेने चौकशी केली तरी सत्य बदलणार नाही. त्यामुळे रिया चक्रवर्ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आतापर्यंत मुंबई पोलिस किंवा ईडीच्या चौकशीला ज्या पद्धतीने रिया सामोरे गेली तशीच ती सीबीआयच्या चौकशीलाही सामोरी जाईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पुरावे, परिस्थिती आणि मुंबई पोलिसांच्या अहवालाचे अवलोकन केले आहे आणि स्वत: रियानेच सीबीआय चौकशीची मागणी केली होती, त्यामुळे न्याय होणार आणि हा अपेक्षित निकाल आहे.
- सतीश मानेशिंदे, रिया चक्रवर्तीचे वकील
>दूध का दूध पानी का पानी होईल
सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणात शंका-कुशंका होत्या. त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती. न्यायालयाने आपल्या निर्णयातून ही अपेक्षा पूर्ण केली. त्यामुळे या प्रकरणात आता दूध का दूध आणि पानी का पानी होईल. पोलिसांमध्ये जे अनावश्यक वाद निर्माण झाले त्यालाही आता ब्रेक लागेल. सीबीआई चौकशीतून सत्यस्थिती देशातील जनतेच्या समोर येईल.
- प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते
आडकाठीनेच संशय निर्माण झाला
सुशांतसिंहचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याची चर्चा होत असताना तपासात ढिलाई जाणवली. आता तरी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी आडकाठी न घालता तपासात सहकार्याची भूमिका घ्यावी. दरम्यान, अद्याप तपासच झाला नसताना मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप करणे अन्यायकारक आहे.
- संजय निरुपम, काँग्रेस नेते
>न्यायाने सत्य वास्तवात अवतरते. सत्यमेव जयते.
- अंकिता लोखंडे

Web Title: Politics heats up over CBI probe; The dust of the accused transplants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.