शहीद स्मारकावरून राजकारण
By admin | Published: April 17, 2015 12:19 AM2015-04-17T00:19:57+5:302015-04-17T00:19:57+5:30
विलेपार्लेतील शहीद स्मारकावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. स्थानिक नगरसेविकेमार्फत स्मारकाचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
मुंबई : विलेपार्लेतील शहीद स्मारकावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. स्थानिक नगरसेविकेमार्फत स्मारकाचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे. तर स्मारकाची जागा पालिकेची असल्याने त्यावर कोणीही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत नसल्याची प्रतिक्रिया नगरसेविका ज्योती अळवणी यांनी दिली आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील शहिदांच्या स्मृत्यर्थ माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी २६ जानेवारी २०१३ साली शहीद स्मारक उभारले. विकासकाने कब्जा केलेली जागा पालिका आणि एसआरए प्रशासनाच्या मदतीने सोडवल्यानंतर त्यांनी हे स्मारक उभारले होते. मागील दोन वर्षांपासून त्याची काळजी घेत असताना काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी त्याची नासधूस केल्याचे हेगडे यांच्या निदर्शनास आले.
स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत स्मारकाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हेगडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत केला आहे. हेगडे म्हणाले की, पूर्वी खुल्या असणाऱ्या स्मारकाला विरोधकांनी आता टाळे ठोकले आहे. शिवाय नागरिकांना रोखण्यासाठी या ठिकाणी आता खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे.
या प्रकरणी पालिकेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून अपक्ष नगरसेविका ज्योती अळवणी यांना संपर्क साधला असता, त्यांनी हे वृत्त साफ खोटे असल्याचा दावा केला आहे. अळवणी म्हणाल्या की, गेल्या वर्षभरापासून स्मारकाची दुरवस्था झाली आहे. पूर्वी दुपारच्या वेळेस स्मारक बंद असायचे. शिवाय स्मारकाला कुणीतरी टाळे ठोकले होते. स्थानिकांच्या तक्रारी आल्यानंतर उद्यान विभागाला तक्रार करून ते पूर्णवेळ खुले करण्यात आले.
शिवाय स्मारकाला ठोकलेले जुने टाळे तोडण्यात आले. सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत स्मारक सर्वांसाठी खुले आहे. दरम्यान, दिवसभर स्मारकाची देखरेख करण्यासाठी पालिकेचा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. केवळ सायंकाळनंतर उद्यान बंद करताना स्मारकाला पालिकेचे टाळे लावण्यात येते. (प्रतिनिधी)