मांसविक्रीबंदीचे राजकारण तापले
By admin | Published: September 11, 2015 05:30 AM2015-09-11T05:30:12+5:302015-09-11T05:30:12+5:30
जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात मांसविक्री चार ते आठ दिवस बंद ठेवण्याच्या मीरा-भार्इंदर व मुंबई महापालिकांच्या निर्णयावरून राजकारण चांगले तापले असून, शिवसेनेसह
मुंबई : जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात मांसविक्री चार ते आठ दिवस बंद ठेवण्याच्या मीरा-भार्इंदर व मुंबई महापालिकांच्या निर्णयावरून राजकारण चांगले तापले असून, शिवसेनेसह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला टीकेचे लक्ष्य बनविले.
भाजपाची सत्ता असलेल्या मीरा-भार्इंदर महापालिकेने आठ दिवसांकरिता मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश काढून या वादाला तोंड फोडले. तर त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेने दोन दिवस बंदीचा आदेश काढला. वास्तविक, पर्युषण पर्वाच्या काळात मांसविक्री बंद ठेवण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. असे असताना महापालिकेची आगामी निवडणूक समोर ठेवून वाद निर्माण करण्यात आला.
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून गुरुवारी जैन धर्मीयांवर अश्लाघ्य शब्दांत टीका करण्यात आली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बंदीचे समर्थन करताना आजवर चालत आलेल्या परंपरेचे दाखले दिले.
मांसविक्रीबंदीवरून कालपर्यंत भाजपा आणि शिवसेनेत शाब्दिक लढाई सुरू असताना त्यात गुरुवारी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उतरले. मांसविक्रीबंदीचा खेळ भाजपा-शिवसेनेने सुरू केला असून, त्याला
हिंदू विरुद्ध जैन असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा हा
भारतीय जंत पक्ष असून, तो कुठेही वळवळतो. वळवळणे हाच त्यांचा धर्म आहे, अशी टीका राज यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
धार्मिक तणावाचा प्रयत्न - मलिक
जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश गेली ११ वर्षे नियमित अंमलात आणण्यात येत असताना ही बंदी त्यापेक्षा अधिक काळाकरिता लागू करून भाजपाने व जैन धर्मीयांना दमदाटी करून शिवसेनेने धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.