नालेसफाई घोटाळ्याला राजकारणाचा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2015 12:54 AM2015-09-24T00:54:33+5:302015-09-24T00:54:33+5:30

नालेसफाईतील घोटाळ्याप्रकरणी अभियंत्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Politics of the Nalasaiya scam | नालेसफाई घोटाळ्याला राजकारणाचा रंग

नालेसफाई घोटाळ्याला राजकारणाचा रंग

Next

मुंबई : नालेसफाईतील घोटाळ्याप्रकरणी अभियंत्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी आता नालेसफाईच्या घोटाळ्याला राजकारणाचे ‘ग्रहण’ लागले आहे. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येच आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यात आता विरोधी पक्षांनीही उडी घेतली आहे. परिणामी घोटाळे बहाद्दर कंत्राटदारांना नक्की कोण पाठीशी घालत आहे, याचे उत्तर अनुत्तरितच आहे.
नालेसफाईच्या घोटाळ्याप्रकरणी मागील आठवड्यातील शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तीन मुकादम/जलनि:सारण साहाय्यक, ६ दुय्यम अभियंता आणि ४ साहाय्यक अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. तर व्हीटीएस आॅपरेटर-मेसर्स फ्लेक्सीटेक प्रायव्हेट लिमिटेड, नालेसफाई कंत्राटदार-मेसर्स आकाश इंजिनिअरिंग कन्स्लटंट, आर.ई.इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स नरेश ट्रेडर्स, वजनकाटा ठेकेदार-मेसर्स लकी वे ब्रिज, मेसर्स साईराज फुल्ली कॉम्प्युटरराइज वे ब्रिज, मेसर्स देवनार वे ब्रिज यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी कंत्राटदारांची पाळेमुळे उघडत नालेसफाईच्या कामात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. आणि सत्तेत वाटा असणाऱ्या शिवसेनेला हा आरोप पचला नाही. परिणामी मंगळवारी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपावर तोंडसुख घेतले. शिवाय १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत अथवा राजीनामा द्यावा, असे आवाहन केले.
या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोवर भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी बुधवारी राहुल शेवाळे यांनीच निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हणत शिवसेनेला डिवचले. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी बुधवारी सत्ताधारीच नालेसफाईतील घोटाळे बहाद्दर कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर वचक राहिली नसल्याचे म्हटले.
एकंदर कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले असले तरी नालेसफाईच्या कामाचा पुढील अहवाल अद्याप सादर झालेला नाही. परिणामी तो सादर झाल्यानंतर आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर पडेल, असे भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे नालेसफाईचा पुढील अहवाल तूर्तास आला नसला तरीही सद्यस्थितीत महापालिकेत नालेसफाईच्या घोटाळ्याहून रंगलेल्या राजकारणात नक्की कोण कोणाला पाठीशी घालते आहे, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Politics of the Nalasaiya scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.