लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात, ईडीने दीड महिन्यांपासून आमच्याशी पत्रव्यवहार करीत आहे. त्यांनी जी माहिती मागितली, ती आम्ही दिली. चौकशीच्या नोटिसीत पीएमसी बँकेचा कोणताही उल्लेख नाही. मग भाजपची माकडं पीएमसी बँकेचा मुद्दा का लावून धरत आहेत, पीएमसी बँकेप्रकरणी चौकशी होणार असल्याचे यांना कोणी सांगितले, ईडीने भाजपच्या कार्यालयात स्वतःचे कार्यालय थाटले आहे का, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी भाजपवर हल्लाबोल केला.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स बजावले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसेना भवनात साेमवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. माझ्या पत्नीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने घर घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ईडीने आता नोटीस पाठविली आहे. भाजपचे तीन लोक सतत ईडी कार्यालयात जात आहेत. तिथून कागदपत्रे घेऊन येत आहे. राज्यातील सरकार पाडता येत नसल्याने सरकारच्या खंद्या समर्थकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तुम्ही नोटीस पाठवा किंवा अटक करा, या सरकारचा बालही बाका होणार नाही. मात्र, बायकांच्या पदराआडून राजकारण करण्याची तुमची खेळी तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले.
वर्षभरापासून भाजप नेते आणि त्यांचे हस्तक मला भेटण्याच्या प्रयत्नात आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी झाली आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाइट करणार आहोत, अशी धमकावणी केली जात आहे. या हस्तकांनी मला २२ आमदारांची यादी दाखविली. आघाडीतील आमदारांची, ठाकरे परिवाराशी संबंधितांची यात नावे आहेत. यांच्यावर ईडीचा दबाव आणून राजीनामे घेतले जातील. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकून(??) असून, आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केला जात आहेत. त्यांच्या धमक्यांना मी बधलो नाही, मीही त्यांचा बाप आहे, असे संजय राऊत म्हणाले.
*‘...तर तुमचे वस्त्रहरण करावेच लागेल’
सरकार पाडण्याची नोव्हेंबरची डेडलाइन उलटली, त्यामुळे सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम ईडीमार्फत केले जात आहे, पण मला तोंड उघडायला लावू नका. मी तोंड उघडले, तर केंद्राच्या सत्तेला हादरे बसतील. तुमचे उद्योग, तुमच्या मुलाबाळांचे हिशोब माझ्याकडे आहेत, पण कुटुंबापर्यंत जाण्याची आमची संस्कृती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुणाच्या कुटुंबापर्यंत न जाण्याचा सल्ला दिला आहे, परंतु तुम्ही बायका-पोरांना यात आणत असाल, तर तुमचे वस्त्रहरण करावेच लागेल, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.
..............................