पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर मतांचे राजकारण, कधी होणार आमचा विकास? मिठी कधी सुंदर होणार?
By सचिन लुंगसे | Published: April 5, 2024 01:27 PM2024-04-05T13:27:47+5:302024-04-05T13:28:21+5:30
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कालिना, कुर्ला, चांदिवली या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अल्पसंख्याकांचे प्राबल्य सुरुवातीपासूनच मतदारसंघावर असून, २००९ आणि २००४च्या निवडणुकांत याचा फायदा काँग्रेसला झाला आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कालिना, कुर्ला, चांदिवली या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अल्पसंख्याकांचे प्राबल्य सुरुवातीपासूनच मतदारसंघावर असून, २००९ आणि २००४च्या निवडणुकांत याचा फायदा काँग्रेसला झाला आहे. मात्र या कार्यकाळात अल्पसंख्याकांच्या वस्त्या असलेले परिसर विकासापासून आजही वंचितच आहेत.
२००५ साली मुंबईतल्या महापुरास कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणानंतर आजही कुर्ला, वाकोल्याला पडलेल्या पुराचा वेढा कायम आहे. मिठी नदीच्या कामांसाठी केंद्राकडूनही हजारो कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी जॉगिंग ट्रॅकसह मिठीचे सौंदर्यीकरण आजही दिवास्वप्नच आहे. कारण कुर्ल्यातल्या क्रांतीनगरसह वाकोला नाला आणि कुर्ला ते सायन रेल्वेस्थानकाच्या रुळांवर येणाऱ्या मिठीच्या पाण्याने मुंबई पाण्यातच जात आहे. मिठीवर भिंती बांधून क्रांतीनगर, संदेश नगरमधील हजारो घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला जात असला तरी भ्रष्टाचाराने त्याला गालबोट लावले आहे.
सुंदरबाग, जरीमरीसारख्या दरडीलगतच्या हजारो झोपड्यांचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. १९९२ सालांपासून झोपड्यांच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी संरक्षक भिंत हा कायमस्वरूपी उपाय नाही हे वारंवार घडणाऱ्या घटनांतून अधोरेखित झाले आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील बहुतांश परिसर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगत वसला असून, फनेल झोनमुळे पुनर्विकासित इमारतींच्या उंचीचा तिढा कायम आहे. सांताक्रूझ, विलेपार्ले, कलिना, वाकोला आणि कुर्ल्यातील वसाहतींचा याला मोठा फटका बसत आहे. फनेल झोनमधील इमारतींची उंची वाढविण्यावर निर्बंध असले तरी एफएसआयचे रूपांतर टीडीआरमध्ये करण्यावरही केवळ खलबतेच सुरू आहेत. त्यामुळे उंचीच्या निर्बंधाचा तिढा सुटण्याची शक्यता कमी असल्याचे विलेपार्ले आणि सांताक्रूझमधील रहिवासी बोलून दाखवतात.
एमएमआरडीए, झोपू, जिल्हाधिकारी कार्यालयाने मोट बांधत हजारो झोपडीधारकांना हक्काचे घर देणे गरजेचे होते. मात्र गेल्याच महिन्यात क्रांतीनगर झोपड्यांच्या पुनर्वसनात गैरव्यवहार उघड झाला आणि या कामाच्या टिमक्या मिरविणारे लोकप्रतिनिधीही तोंडघशी पडले होते.
निव्वळ झोपड्याच नाही तर लाल बहादूर शास्त्री मार्गापासून कुर्ला-अंधेरी रोडच्या रुंदीकरणाचे घोंगडे कित्येक दशके भिजत पडले आहे. अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून ‘मोदी’ लाटेमुळे पूनम महाजन दोन वेळा निवडून आल्या तरी काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनाही मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावता आला नाही, असे मतदार सांगतात.
वांद्रे-कुर्ला संकुलासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र याच मतदारसंघात असले तरी ढिगाच्या संख्येने झोपड्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न कैक वर्षांपासून पडून आहेत.
सांताक्रूझ गोळीबार नगर, कुर्ल्यासह वाकोल्यामधील झोपड्या, वांद्रे पूर्वेकडील रेल्वे रुळालगत वसलेल्या झोपड्या अशा झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पडून आहे.
येथील बहुसंख्या वस्त्या आजही मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. बहुतांश झोपड्या संरक्षण दलाच्या जमिनीवर असून, केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रश्न तडीस नेला जावा म्हणून लोकप्रतिनिधींनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.