Join us

पुनर्विकासाच्या वादातून भांडुपमध्ये पेटतेय राजकारण

By admin | Published: November 14, 2016 4:46 AM

भांडुप स्थानकातून ईश्वरनगर मार्गे लाल बहादूर मार्गाला जाणारा पर्यायी रस्ता सुरू करण्याच्या खासदार किरिट सोमैया यांच्या निर्णयास स्थानिक

मुंबई : भांडुप स्थानकातून ईश्वरनगर मार्गे लाल बहादूर मार्गाला जाणारा पर्यायी रस्ता सुरू करण्याच्या खासदार किरिट सोमैया यांच्या निर्णयास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक तीन इमारतींतील रहिवाशांनी याला विरोध दर्शविला होता.भांडुप स्थानकाची निर्मिती झाल्यापासून पश्चिमेकडे जाण्यासाठी एकच मार्ग असून, आणखी एक मार्ग असावा अशी मागणी भांडुपकर जनता करत होती. त्यानुसार स्थानकाला लागूनच बंद पडलेल्या जी.के. डब्लू. कंपनीतून साडे अठरा फुटांच्या रोडचा डीपी आराखडा पालिकेकडून मंजूर करून घेण्यात आला होता. निवडून आल्यानंतर मनसे नगरसेवकांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला.दुखावल्या गेलेल्या भाजपाने ईश्वरनगरातून जाणारा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मार्ग येथील जयश्री इंडस्ट्रीजच्या खाजगी मालमत्तेतून नेत भांडुप स्थानकाला जोडण्याचा प्रस्ताव मांडला. गेली दोन वर्षे पाठपुरावा करत अखेर शनिवारी दुपारी पालिका आधिकारी सहायक अभियंता राजेंद्र पगार, रेल्वे अधिकारी डिव्हिजनल इंजिनीअर एम.एल. भारती यांना सोबत घेत सोमय्या यांनी जयश्री इंडस्ट्री गाठली. दोन्ही अधिकाऱ्यांना पत्रे देत हा रस्ता पालिकेने ताब्यात घेऊन रेल्वेने तत्काळ येथे प्रवेशद्वार उघडण्याची मागणी केली.कोकणनगर, सह्याद्रीनगर, महाराष्ट्रनगर, जमीलनगर, हनुमाननगर या ठिकाणी पायी तसेच गाडीने जाण्यासाठी हा मार्ग जवळ पडणार आहे. कलम २९७नुसार हजारो नागरिकांचा फायदा, उपयोग होणार असल्याने जयश्री इंडस्ट्रीजच्या खासगी मालमत्तेतील काही जागा रस्त्यासाठी पालिका आयुक्तांकडून मंजूर करून घेतली आहे. त्यानुसार कारवाई करत पालिकेनेही येथील कम्पाउंड वॉल तोडली आहे. या मनमानी कारभाराला आपला विरोध असल्याचे जयश्री इंडस्ट्रीजचे मालक कुटुंबीय मुकेश गांधी यांनी सांगितले. जयश्री इंडस्ट्रीज ही गांधी कुटुंबीयांची खाजगी मालमत्ता असून, इंडस्ट्रीमध्ये दीडशेहून अधिक कामगार काम करीत आहेत. १.६ एकरमध्ये ही इंडस्ट्री असून, हा रस्ता तयार झाल्यास जमिनीचे दोन तुकडे होणार आहेत. तसेच अंबर आणि मोरेश्वर इमारतीसह मारवाडी चाळीतील रहिवाशांनीही अपघातांची, सुरक्षेची भीती व्यक्त केली आहे.