Join us

सेना-भाजपात दबावाचे राजकारण

By admin | Published: November 04, 2015 4:39 AM

कल्याण-डोंबिवली महापौरपदाची निवडणूक होण्यास काही कालावधी बाकी असल्याने शिवसेना व भाजपा हे परस्परांवर दबावाचे राजकारण खेळू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापौरपदाची निवडणूक होण्यास काही कालावधी बाकी असल्याने शिवसेना व भाजपा हे परस्परांवर दबावाचे राजकारण खेळू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वक्तव्ये त्याच खेळीचा भाग आहे. सेनेत महापौरपदाकरिता इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने डोकेदुखी टाळण्याकरिता ऐनवेळी हे पद भाजपाला देण्याची तडजोड होऊ शकते. मात्र कुठल्याही स्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना किंगमेकर होऊ द्यायचे नाही असा शिवसेनेचा आग्रह आहे.कल्याण-डोंबिवलीसाठी पुढाकार कोणाचा?कल्याण-डोंबिवलीमधील कौल युतीच्या बाजूने असल्याने त्याचा आदर करीत एकत्र यायचे हे शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी मनातून ठरवले आहे. मात्र लगेच होकार दिला तर पदरात काही पडणार नाही हे लक्षात आल्याने भाजपाने केडीएमसीत महापौर बसवण्याची भाषा केली. लागलीच उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला सोबत येण्यात रस नाही, अशी टिप्पणी केली.वास्तवात शिवसेनेकडे महापौरपदासाठी तिघे जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पक्षात नाराजी पसरू नये म्हणून शिवसेना महापौरपद भाजपाला देऊन स्वत:कडे स्थायी समिती ठेवू शकते. मात्र आता लागलीच तसे संकेत दिले तरीही इच्छुक नाराज होतील म्हणून इशारे दिले जात असल्याचे समजते.