लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी राजकारण तापू लागले आहे. पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी जाणीवपूर्वक अपुरा कालावधी देण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मदत करण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे राबविण्याची मागणी केली. निवडणुकीतील मतदार नोंदणीसाठी अवघा एक महिनाचा कालावधी देण्यात आला असून हा अवधी वाढवून देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावर, ही सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागासमोर मांडण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थीचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी दिली. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी संमत झाला. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी २७ मे २०१७ चा दिवस उजाडावा लागला. त्यानंतर १ जून ते ३० जून दरम्यान विद्यापीठातील सिनेट निवडणुकांसाठी मतदार नोंदणीचा कालावधी देण्यात आला. या निवडणुका २०१५ साली होणे अपेक्षित होते मात्र नव्या विद्यापीठ कायदा येणार असल्याने त्यांना दोन वर्ष विलंब झाला. विद्यापीठ निवडणुकांच्या मतदार नोंदणीसाठी दिलेला अवधी अपुरा असून ही मुदत एक महिन्यांनी वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मुंबई विद्यापीठाने मतदार नोंदणीबाबत कोणतीच जागरुकता मोहिम राबविली नाही. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर या निवडणुकीत सहभागी होवू शकतात. मात्र त्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेने सिनेटचे फॉर्म भरायचे आहेत. त्याची एक प्रत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये जमा करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील पदवीधर अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत. भाजपा सरकारने अभाविपला मदत करण्याच्या हेतून हा डाव रचल्याचा आरोपही मातेले यांनी केला.
सिनेट निवडणुकांचे राजकारण तापले
By admin | Published: June 29, 2017 3:09 AM