राज्यातील सरकार पाडण्यासाठीच सुशांतसिंह आत्महत्येचे राजकारण, ज्युलिओ रिबेरो यांचा आरोप
By अतुल कुलकर्णी | Published: September 1, 2020 06:17 AM2020-09-01T06:17:11+5:302020-09-01T06:18:54+5:30
लोकांचा सीबीआयवरचा विश्वास उडत चालला आहे
- अतुल कुलकर्णी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप या घटनेकडे राजकीय संधी म्हणून पहात आहे. सीबीआयसारख्या संस्थेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे, असा गंभीर आरोप माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
देशातील सगळ््या पोलिस यंत्रणा सरकारची भाषा बोलतात असे सांगून रिबेरो म्हणाले, केंद्राच्या सीबीआय, ईडी, एनसीबी अशा विविध यंत्रणा या तपासात सहभागी होत आहेत ते पाहून असे वाटते की, केंद्रीय तपास यंत्रणांना आता दुसरे काही काम उरलेले नाही. सरकार पाडण्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत, मात्र जो मार्ग निवडला गेला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. या गुन्ह्याचा तपास कायद्यानुसारच व्हावा. गुन्ह्यावरून राजकारण होणे ही बाब धोक्याची आहे. आदित्य ठाकरेंच्या बॉलीवूडमधील मैत्रीचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. आम्हाला स्पष्ट दिसत आहे की ही आत्महत्या आहे. सुशांत त्याच्या बेडरूममध्ये एकटाच होता. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धत अवलंबली. आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याचे दिसले तरच एफआयआर करतात. त्या दृष्टीने तपास चालू होता. मात्र एफआयआर दाखल केला नाही यात काहीच चुकीचे नाही. न्यायालयाने चुकीने हे प्रकरण सीबीआयकडे दिले असावे, असेही रिबेरो म्हणाले.
ज्या पद्धतीने अंकिता लोखंडेनी पुरावे दिले, तसे पुरावे देण्याचे काम आता रियाने देखील करावे असे सांगून रिबेरो यांनी जनतेला या विषयात रस असल्यामुळे माध्यमे सक्रीय झाली. सीबीआय संचालकाची निवड कशी करावी हे न्यायालयाने सांगितले आहे. दुर्दैवाने काही वर्षांत जे चालू आहे ते पहाता, सीबीआयवरील विश्वास उडाला आहे. सरकार सीबीआयचा राजकीय वापर करत आहे.
राजकीय स्वाथार्साठी पोलीस यंत्रणेचा वापर होतो. ‘रूल आॅफ लॉ’ची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर न्यायालयात दाद मागता आली असती. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी झाले आहे. आपल्याकडे देखील बिहारचे पोलिस अधिकारी क्वॉरंटाईन केले गेले ते अत्यंत चुकीचे घडले. तसे व्हायला नको होते. यातून एकच लक्षात येते की, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. मुंबईचे आयुक्त होण्यासाठी एक स्पर्धा लागली आहे. त्यासाठी लॉबिंग केले जाते. तसे करुन पद मिळाले की सरकारचे काम करावे लागते, असा टोमणाही रिबेरो यांनी लगावला.