मुंबई- मुंबईत हक्काची घरं देणाऱ्या म्हाडाच्या घरांसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडानं घरांची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 23 मेनंतर ही सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 घरांसह मुंबई व कोकणातील 276 दुकानांच्या सोडतीची जाहिरात 3 मार्च रोजी प्रसिद्ध केली होती.अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूरमधील शेल टॉवर येथील इमारत क्रमांक 2, 23, 37 मध्ये 170 सदनिका आहेत. सदनिकांचे क्षेत्रफळ 348 ते 381 चौरस फूट आहे. सदनिकांची किंमत 31 लाख 54 हजार ते 34 लाख 33 हजार आहे. चेंबूरमधील सहकारनगर येथे मध्यम उत्पन्न गटासाठी एक सदनिका आहे. तिची किंमत 39 लाख 64 हजार आहे. पवई येथे 46 सदनिका आहेत. त्यांची किंमत 55 लाख 61 हजार आहे.217 घरांसाठीची अर्ज नोंदणी 7 मार्चपासून सुरू झाली. अनामत रकमेसहित अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल आहे. म्हाडाच्या 217 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ झाला असून, मुंबई व कोकण मंडळांतर्गत येणाऱ्या दुकान गाळ्यांच्या ई लिलावासाठी नोंदणीही सुरूच आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे घरांची सोडत काढण्यासाठी म्हाडावर निर्बंध आले आहेत. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर जवळपास महिन्याभरासाठी ही सोडत पुढे गेली आहे. घरांच्या सोडतीची तारीख 23 मेनंतर जाहीर करू, असंही म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.
आचारसंहितेमुळे म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 9:32 AM